
no images were found
हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरणासाठी सामंजस्य करार दिशादर्शक
पुणे : हवामान बदलाच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याबाबत करण्यात आलेला करार दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरेल असा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला.
विभागातील निकृष्ट, नापिक पडीक जमिनीच्या तुकड्यांचे पुनरुज्जीवन करून हरितीकरण करण्याकरिता वृक्षारोपणाचा आदर्श उपक्रम राबविण्यासाठी चौदा ट्रीज फाऊंडेशन व विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामध्ये सामंज्यस्य करार करण्यात आला. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नगर पालिका प्रशासन सह आयुक्त पूनम मेहता, चौदा ट्रीज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रविण भागवत, संचालक किरण देशपांडे, एकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त अजय फाटक आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, पर्यावरणाच्या पुनरुज्जीवनासाठी या प्रकारच्या समग्र व बहुआयामी उपक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. नापीक जमीनींना पर्यावरण पूरक बनविणे, कार्बन सिंक तयार करणे, हरित उपजीविका निर्माण करणे या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. डॉ. भागवत म्हणाले, या कराराच्या माध्यमातून प्रशासनासोबत काम करुन निकृष्ट, अनुत्पादक जमिनीचे हरीत पट्ट्यामध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न आहे. संस्था नागरिकांना हवामान विषयक बाबीमध्ये सक्रिय सहभागी होण्यास प्रोत्साहित करेल. चौदा ट्रीज फाऊंडेशनच्या आयआयटी कानपूर, एकॉलॉजिकल सोसायटीसारख्या नामांकित स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी असल्याचे त्यांनी संगितले. करारानुसार खेड तालुक्यातील ओसाड, नापिक, निकृष्ट व पडीक जमिनीवर स्थानिक पर्यावरणाशी सुसंगत असणाऱ्या वनस्पतीची लागवड करण्यात येणार आहे. पुनर्वनिकरणाद्वारे शाश्वत विकास करणे, कार्बन फुट प्रिंट तयार करणे, पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करणे, भूजलाच्या पाण्याची पातळी वाढवून त्यातून जैवविविधता पुनर्संचयित करणे असा व्यापक दृष्टीकोन या करारामध्ये आहे. या कामाची सुरुवात वेताळे गावातून करून शेजारच्या गावांमध्ये त्याचा विस्तार करुन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक नाविन्यपूर्ण मॉडेल तयार करण्यात येणार आहे.