
no images were found
रोहन-विनायक ला मिळाली अमिताभ बच्चन यांची साथ
कौन बनेगा करोडपती या अत्यंत लोकप्रिय शोच्या 15व्या सीझनच्या नवीन प्रोमोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये होस्ट अमिताभ बच्चन म्हणतात, ‘बदल रहा है देश, बदल रहा है कौन बनेगा करोडपती’ आणि आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीने त्यांनी समस्त देशाला भुरळ घातली आहे. या प्रोमोचे काव्यात्मक संवाद रोहन-विनायक यांनी स्वरबद्ध केले आहेत आणि या रियालिटी क्विझ शोच्या चालीला श्री.बच्चन यांचा आवाज लाभला आहे.केबीसीच्या चाहत्यांच्या थेट हृदयाला साद घालणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या आवाजात या शोच्या नवेपणाची चाहूल लागते आणि आपल्या देशाने आणि जनतेने स्वीकारलेल्या इतर बदलांप्रमाणेच हा शो देखील बदललेल्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे.
संगीतकार रोहन-विनायक महानायक अमिताभ बच्चनचे चाहते आहेत आणि यापूर्वी त्यांनी श्री. बच्चन यांच्या पिंक, सरकार 3 आणि 102 नॉट आउट या चित्रपटांना संगीत दिले आहे. आणि आता कौन बनेगा करोडपतीच्या थीम म्युझिकमध्ये त्यांनी नवीन प्राण फुंकले आहेत. ही चाल श्री. बच्चन आपल्या भारदस्त आवाजात गुणगुणतात, त्यामुळे त्याला एक नवीनच परिमाण प्राप्त होते.या चालीचा विचार आणि त्याची रचना याविषयी बोलताना रोहन म्हणतो, “केबीसी 15 ची चाल आमच्या मनात आणि हृदयात ठसली आहे आणि या शोसाठी ती खास आहे. श्री. बच्चन यांना थीम चाल गाण्यास सांगण्यामागे आमचा हाच विचार होता की, होस्ट आणि ही चाल या दोन्ही मध्ये या कार्यक्रमाची ओळख दडलेली आहे. त्यामुळे जनतेला नव्या शोमध्ये पाचारण करण्यासाठी त्या दोघांना एकत्र आणणे आम्हाला सयुक्तिक वाटले.”रोहनशी सहमत होत विनायक पुढे म्हणतो, “अगदी लहान असल्यापासून आम्ही श्री. बच्चन यांचे चाहते आहोत. त्यांच्यासोबत आम्ही अगोदर देखील काम केले असल्याने आम्ही हे जाणतो की, त्यांच्या आवाजात ती मोहिनी आहे, जी देशाला एकत्र आणू शकते. त्यामुळे मी आणि रोहनने खूप विचार केला आणि शेवटी आम्हाला ही युक्ती सुचली की, जो या शोचा चेहरा आहे तोच या व्हिडिओचा आवाजही असावा.”मेगास्टार बच्चन यांच्या आवाजातील भारदस्तपणा त्यांच्या या प्रोमोमधील गाण्यात शोभून दिसला आहे. त्यांच्या आवाजात ‘नए अरमान, नई मुस्कान, नए आसमान लिए’ ऐकले की, आपल्या लक्षात येते की कौन बनेगा करोडपती 15 ‘जल्द ही एक नए रूप में’ येणार आहे!