no images were found
रोजगाराच्या संधीसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक : डॉ. संजय कुबल
कोल्हापूर : उद्योग व रोजगारक्षम कौशल्य विकासासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव डॉ.संजय कुबल यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम विभागाच्या वतीने आयोजित गुणपत्रक व प्रमाणपत्र वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपकुलसचिव श्री.सी.एस.कोतमिरे होते. यावेळी सहाय्यक कुलसचिव पी.एस.शिरोळे, कक्ष अधिकारी एन.पी.साळुंखे, समन्वयक डॉ. के.बी.पाटील डॉ.सी.ए.बंडगर, डॉ.एस.व्ही.माने व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.कुबल म्हणाले की, आजच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचे अध्ययन व अध्यापनात बदल करणे गरजेचे आहे.त्याप्रमाणे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या उद्योजक व रोजगारक्षम कौशल्य विकासासाठी आणखी विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ मध्ये चार प्रमाणपत्र अभ्यासक्रम दूरशिक्षण केंद्र अंतर्गत सुरू करण्यात आले होते.
त्यामध्ये मुख्य कार्यालयातून बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि ट्रॅव्हल व टुरिझम सर्टिफिकेट तसेच सातारा विभागीय केंद्रातून ग्रंथालय व्यवस्थापन व ग्रामीण पत्रकारिता जनसंवाद हे कोर्स सुरू करण्यात आलेले होते. यातील बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि ट्रॅव्हल व टुरिझम या अभ्यासक्रमाचे गुणपत्रके व प्रमाणपत्रे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.पी.एन.देवळी यांनी केले, तर आभार डॉ.एन.एस.रणदिवे यांनी केले.