no images were found
पशुसंवर्धन विभागामार्फत 21 व्या पशुगणनेस सुरुवात
कोल्हापूर : पशुसंवर्धन विभागाकडून दर 5 वर्ष्यांनी पशुगणना केली जाते. या अंतर्गत 21 व्या पंचवार्षिक पशुगणनेस 25 नोव्हेंबर 2024 पासून प्रारंभ होत असून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. पशुगणना मोहिमेत गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुटपक्षी, पशुपालनात वापरली जाणारी यंत्रसामुग्री यांची गणना केली जाणार आहे. या पशुगणनेच्या आधारावर शासनाकडून विविध धोरण, योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. त्यानुसार लसीकरण, औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी प्रगणकांना द्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी केले.
ग्रामीण भागासाठी दर 3 हजार कुटुंबामागे एक प्रगणक तर शहरी भागासाठी 4 हजार कुटुंबामागे एक प्रगणक नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यात एकूण 277 प्रगणक व 71 पर्यवेक्षकांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. यंदाची पशुगणना दि. 25 नोव्हेंबर पासुन सुरु होत आहे. या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. पशुगणनेसाठी प्रगणकांची व पर्यवेक्षकांची नेमणुक केली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन पशुसंवर्धन पंधरवड्यामध्ये डॉ. शेजाळ व डॉ. बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शशांक कुलकर्णी यांनी केले असून तालुकानिहाय प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात 1 हजार 255 गावांसाठी 205 प्रगणक व 55 पर्यवेक्षक असून, शहरी भागासाठी 72 प्रगणक व 16 पर्यवेक्षक असे एकूण 277 प्रगणक व 71 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 20 वी पशुगणना 2029 मध्ये पार पडली होती त्यावेळी प्रगणकांना टॅब दिले होते. त्यावर माहिती भरुन घेण्यात आली होती. परंतु 21 व्या पशुगणनेसाठी प्रगणकांना स्वतःचे मोबाईल वापरावे लागणार असून प्रगणकांना मानधन आणि मोबाईल वापराचा वेगळा मोबदला दिला जाणार असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.