
no images were found
जायच नव्हतं, तर आम्हाला शपथविधीला का जायला सांगितलं :- उपमुख्यमंत्री पवार
मुंबई :– 2014 ला फडणवीस मुख्यमंत्री झाले, आम्ही सिल्व्हर ओकला बसलो होतो, प्रफुल पटेल आणि साहेबांचं बोलणं झालं. भाजपला बाहेरून पाठिंबा देतो, असं सांगितलं. नेत्यांचा निर्णय आम्ही गप्प बसलो. मग आम्हाला वानखेडेला शपथविधीला जायला सांगितलं. त्यांच्याबरोबर जायच नव्हतं, तर आम्हाला शपथविधीला का जायला सांगितलं?’ असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारला.
2017 साली सुनिल तटकरे, जयंत पाटील मी आणि बाकीचे नेते यांच्यात आणि फडणवीस, मुनगंटीवरा, तावडे आणि चंद्रकांतदादा यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक झाली. खाती, पालकमंत्री सगळं ठरलं. यानंतर निरोप आला आणि तटकरेंना दिल्लीला बोलावलं. त्यांच्या वरिष्ठांबरोबर आमच्या वरिष्ठांची बैठक झाली. 25 वर्ष आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला आम्ही सोडणार नाही, असं भाजपने सांगितलं. तेव्हा आमचे वरिष्ठ म्हणाले आम्हाला शिवसेना चालत नाही, असा दावा अजित पवारांनी केला आहे.
2019 ला निकाल लागले, परिस्थिती काय होती माहिती आहे. मोठ्या उद्योगपतीच्या घरी, आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, उद्योगपती, भाजपचे वरिष्ठ नेते मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सगळी चर्चा झाली. पाच बैठका त्या बंगल्यात झाल्या, मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठे बोलायचं नाही, नेत्यांनी सांगितलं म्हणून मी बोललो नाही. हे सगळं सुरू असताना अचानक बदल झाला आणि शिवसेनेसोबत जायचं सांगतिलं. 2017 ला शिवसेना जातियवादी आणि दोन वर्षांनी ते मित्रपक्ष झाला आणि भाजपसोबत जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला, असं चालत नाही, असं म्हणत अजित पवारांनी 2019 च्या शपथविधीबद्दल गौप्यस्फोट केला.
‘एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाला नव्हता तेव्हा सगळ्या आमदारांनी पत्र लिहिलं सरकारमध्ये सामील व्हा म्हणून, त्यावर सगळ्या आमदारांच्या सह्या आहेत. यानंतर प्रफुल पटेल, मी आणि जयंत पाटील यांची कमिटी केली. भाजपच्या वरिष्ठांनाही सांगितलं, त्यानंतर त्यांनी या गोष्टी फोनवर बोलता येणार नाहीत, म्हणून इंदूरला बोलावलं. पण मीडियाला कळेल म्हणून तिकडे जाऊ दिलं नाही. सगळ्या आमदारांच्या पत्राची झेरॉक्स माझ्याकडे आहे,’ असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.