no images were found
ॲट्रॉसिटी प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी समन्वयाने काम करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर : ॲट्रॉसिटी प्रकरणातील पीडितांना जलद गतीने न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी दिल्या.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला समिती सदस्य तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार (ॲट्रॉसिटी) अंतर्गत पीडितांचे जातीचे दाखले प्राप्त करुन घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे, असे सांगून ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत पोलीस तपासावरील २०, कागदपत्रांअभावी 19 प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत पोलीस विभागामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच पोलीस तपासावरील प्रकरणांची निर्गतीही लवकरच करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय समितीमार्फत एकूण 25 प्रकरणांतील पिडीतांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली. तालुकास्तरावर उपविभागीय समिती स्थापन करणे, अशासकीय सदस्यांमार्फत जातीचे दाखले प्राप्त करुन घेणे, एकदिवसीय कार्यशाळांचे आयोजन करणे या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. अर्थसहाय्यासाठी मंजूर झालेल्या प्रकरणांना अनुदान प्राप्त होताच नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला. समितीचे सदस्य सचिव विशाल लोंढे यांनी ॲट्रॉसिटी प्रकरणांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.