
no images were found
तब्बल १७ बँक खात्यांची झाडाझडती, मोठं घबाड हाती!
पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाइकांच्या नावाने असलेल्या एकूण १७ बँक खात्यांमध्ये ४७ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात समोर आले आहे.मात्र, हे पैसे कोणत्या माध्यमातून जमवले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, रामोड यांना मंगळवारी (१३ जून) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात जमीनधारकाला जादा मोबदल्या देण्यासाठी रामोड यांनी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारली.
सीबीआयने सापळा लावून रामोड यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयातून सहा कोटी ६४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
या प्रकरणी दाखल गुन्ह्यात सीबीआय न्यायालयाने रामोड यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी कोठडी संपल्याने रामोड यांना न्यायालयात आणण्यात आले होते ‘आरोपीला जामीनावर सोडल्यास पुराव्यांमध्ये छेडछाड करण्याबरोबरच कर्मचारी व साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रकार घडू शकतो;
तसेच त्यांचे कार्यालय व इतर ठिकाणाहून पुरावे जमा करायचे असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी,’ अशी विनंती तपास अधिकाऱ्यांनी सीबीआय न्यायालयाकडे केली. ती विनंती मान्य करीत सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी रामोड यांना २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे रामोड यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
दरम्यान, रामोड याच्या जामिनासाठी अर्ज केला जाणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. तपासादरम्यान रामोड यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.