
no images were found
महाराष्ट्रातील डिजिटल मीडियाला राजमान्यता : राज्य शासनाकडून प्रक्रिया सुरु
महाराष्ट्रातील डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ आस्थापनांना श्रमिक पत्रकार कक्षेत घेण्यासाठी डिजिटल मिडिया संपादक-पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ राजा माने यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी केली होती. या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने महाराष्ट्रातील डिजिटल मीडियाला राजमान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राजा माने यांच्या मागणीला यश आल्याने त्यांचा कोल्हापुरातील डिजिटल मिडिया संघटनेच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
डिजिटल मिडियाला राजमान्यता मिळण्यासाठी राजा माने यांचे अथक प्रयत्न सुरु होते. मध्यंतरी त्यांनी सातारा जिल्ह्यातील भिलार-महाबळेश्वर येथे महाराष्ट्रातील डिजिटल मिडिया संघटनेचे राज्य अधिवेश घेतलं. या अधिवेशनात डिजिटल मिडियाला राजमान्यता मिळावी, अशी मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली होती. त्याचा पाठपुरावा सुरु होता. आणि या मागणीला अखेर यश आलं. डिजिटल मिडिया पत्रकारिता क्षेत्रातील नव्या ऐतिहासिक पर्वाची मुहूर्तमेढ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने रोवली. डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ आस्थापनांना ‘श्रमिक पत्रकार’ कक्षेत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राजा माने यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याने कोल्हापूर डिजिटल मिडिया संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी बैठक घेवून राजा माने यांचा अभिनंदनाचा ठराव सर्वांनुमते केला. तसेच पुढील आठवड्यात राजा माने कोल्हापूर दौ-यावर येत आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व डिजिटल मिडियामध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी, सदस्यांचा मेळावा घेवून त्यामध्ये राजा माने यांचा विशेष सत्कार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्यस्तरीय सदस्य प्रमोद मोरे, जिल्हाध्यक्ष सुहास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, शहर अध्यक्ष प्रशांत चुयेकर, सदस्य आप्पासाहेब माळी आदींनी मार्गदर्शन केलं. बैठकीस संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.