
no images were found
कोल्हापूर लोकसभेची जागा नियमानुसार राष्ट्रवादीचीच : आ. हसन मुश्रीफ
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पाचपैकी तीनवेळा कोल्हापूरलोकसभा मतदारसंघातून आमचा उमेदवार विजयी झालेला आहे.सध्या दोन्ही काँग्रेसचे पाच आमदार असल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत काढून ‘कोल्हापूर’ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेऊ, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत गतवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक होते; तर शिवसेनेचे संजय मंडलिक होते. त्यावेळी शिवसेना व भाजपची युती होती. त्यावेळी भाजप-सेना युतीचे लोकसभा मतदारसंघात राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक व चंद्रदीप नरके हे चार आमदार होते. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. सध्या आपल्यासह काँग्रेसचे पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव व राष्ट्रवादीचे राजेश पाटील आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हवा. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये आपण सुचविलेले नाव सर्वांनाच माहीत आहे. लोकसभेसाठी व्ही. बी. पाटील, चेतन नरके, के. पी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत.