no images were found
किल्ले रायगडावर१६७४ ची पुनरावृत्ती; शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे. राज्य सरकारकडून या सोहळ्याची भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. पहाटे किल्ले रायगडावरील राज सदरेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच यावेळी सर्व शिवभक्तांना शपथ देण्यात आली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची राजेशाही मिरवणूक आहे. या मिरवणुकीला राज सदरेपासून सुरुवात होवून. नगारखाना, होळीचा माळ, सचिवालय, जगदिश्वर मंदिर असा या मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांनी गर्दी केली आहे. सकाळपासूनच किल्ले रायगड शिवभक्तांनी ढोल, ताशा आणि नगाऱ्यांनी दणाणून सोडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातून शिव-शंभूंचा जयजयकार घुमणार आहे. गागाभट्ट्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ संपन्न झाला होता. त्यावेळेला जे रिती-रिवाज केले गेले, त्याच परंपरेचे आणि पूजा-अर्चाचे पालन आजच्या दिवशी करून शिवराज्याभिषेक सोहळा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्री महोदय रायगडावर दाखल झाले आहेत. संपूर्ण रायगड शिवभक्तांच्या उत्साहाने गजबजला. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर ५ आणि ६ जून या कालावधीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.