no images were found
राजाराम तलावानजीक साकारणार अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर;-श्री.क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड त्यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. यामुळे विचारांचे अदान- प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर मर्यादा येत आहेत. यामुळे अपेक्षित असणारी विकास प्रक्रिया गतिमान करताना अडथळे निर्माण होत आहेत. ही उणीव दूर करण्याच्या हेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी कोल्हापूर शहरात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे Convention Center (परिषद केंद्र) निर्मिती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्याकडे दि.०९ जानेवारी २०२३ रोजी लेखी पत्राद्वारे केली होती. याबाबत तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. त्यानुसार नियोजन विभागाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी राजाराम तलाव येथील जागा प्रस्तावित केली आहे. यासंदर्भात कोल्हापूर मध्ये राजाराम तलावाच्या बाजूला १०० कोटी चे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याबाबत सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन हजार प्रेषक क्षमतेचे अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. आज सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीच्या सुरवातीस अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या संदर्भात माहिती देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सीमा भाग या सर्वांचे केंद्र स्थान कोल्हापूर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, डॉक्टर्स, बार कौन्सिल, क्रीदाई, गोकुळ दुध संघ, बाजार समिती, औद्योगिक वसाहतींसह सामाजिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत अनेक संघटना आहेत. या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळे अशा संघटनाना खासगी हॉटेल्स किंवा मर्यादित स्वरूपात असणाऱ्या शासकीय सभागृहांचा वापर करावा लागतो. यामधून विचारांचे अदान- प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर मर्यादा येत आहेत. यामुळे अपेक्षित असणारी विकास प्रक्रिया गतिमान करताना अडथळे निर्माण होत आहेत. ही उणीव दूर करण्याच्या हेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी कोल्हापूर शहरात अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारून त्याठिकाणी हजारो सभासदांकरिता बैठक व्यवस्था, अत्याधुनिक ऑनलाईन कॉन्फरन्स सुविधा, वाचनालय, आर्ट गॅलरी, जलतरण तलाव, उपहारगृह, प्रदर्शन हॉल या सारख्या सुविधा देण्याची आवश्यकता आहे. हि आवश्यकता पूर्ण करण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या इतर पाच जिल्ह्यांच्या विचार करून भविष्यातील सामाजिक, औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक वाढ व विकास प्रक्रिया गतिमान करण्याच्या हेतूने कोल्हापूर शहरात अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर निर्मितीसाठी रु.१०० कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली.
यानंतर बैठकीत अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या प्राथमिक आराखड्याची माहिती मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे समोर सादर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर शहरात राजाराम तलावाजवळील शासकीय जमिनीवर दोन हजार लोकांच्या क्षमतेचे अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य सेंटरमध्ये ऑडिटोरियम, बँक्वेट हॉल व कॅफेटेरिया आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. सदरच्या कन्वेंशन सेंटरमुळे इकोसिस्टीम डिस्टर्ब होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. २ लाख १३ हजार स्क्वेअर मीटर च्या प्लॉटवर सेंटर उभारणार असून त्याचा बिल्टप एरिया १ लाख ३३ हजार स्क्वेअर फुट मध्ये असणार आहे.
कन्वेंशन सेंटर मध्ये कल्चरल ऍक्टिव्हिटी चालावी त्या अनुषंगाने कन्व्हेन्शन सेंटरच्या प्लॅनमध्ये सुधारणा करावी. इतके भव्य सेंटर उभारताना पर्यटकांकरिता तसेच सेंटर लगत वेगवेगळ्या उद्देशासाठी होणारे कार्यक्रम यांचे करिता तसेच सेंटरच्या जागेच्या बाजूला काही अंतरावर एमआयडीसी, शिवाजी विद्यापीठ व विमानतळ असल्यामुळे सेंटरच्या लगत च्या प्लॉटमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी नियोजन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्री देवरा यांना केले.
यासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने राजाराम तलावामध्ये लेझर शो लाईट, साऊंड सिस्टिम आदीद्वारे तलावाचे सुशोभिकरण करावे, अशीही मागणी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली. सदर कन्व्हेन्शन सेंटर उभारणी करिता नोडल एजन्सी एमएसआरटीसी विभाग असणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. तसेच सदरच्या कन्वेंशन सेंटरचे काम १२ महिन्यात पूर्ण करावे, त्याकरिता आवश्यक रु.१०० कोटीचा निधी नगर विकास विभागातून देण्याचे आदेश मुख्यमंत्री ना.माश्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले. यासह या व्यतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास नियोजन विभागाच्या माध्यमातून निधीची तरतूद करावी असेही निर्देश त्यांनी दिले.
सदर बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, महसूल व वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, एम एस आर डी सी विभागाचे प्रमुख श्री मोपलवार, कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.