no images were found
“शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत गांधी मैदानात भव्य सभेचे आयोजन : श्री.राजेश क्षीरसागर यांची माहिती
कोल्हापूर -( प्रतिनिधी)::निधीसह योजना आहे, पण पात्र व्यक्तीस त्याचा पत्ताच नसतो. योजनेवर मग पाणीच फेरले जाते. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने “जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची” हा उपक्रम सुरू केला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कागदपत्रांसह हेलपाटे घालावे लागण्याची बाब नवी नाही. राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला व्हावा, यासाठी “शासन आपल्या दारी” हे राज्यस्तरीय अभियान मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती सरकार कडून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस दि.२८ मे २०२३ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती महात्मा गांधी मैदानात सायंकाळी ५.०० वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य नियोज मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भात शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या दौऱ्यासंदर्भात माहिती देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात शासन आपल्या दारी अभियान राबविले जाणार आहे. याचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या विविध योजना गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. याकामी कोल्हापूर जिल्ह्यात शिवदूतांची नेमणुकीचे काम अंतिम टप्प्यात असून, शिवदूत आणि शासन यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून ७५ हजार पेक्षा जास्त नागरिकांना या अभियानातून लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांची दि.२८ मे २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता महात्मा गांधी मैदान येथे भव्य सभा होणार आहे. यामध्ये राज्यमंत्रीमंडळातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहे. या सभेस कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या दौऱ्याच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये राज्य नियोज मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी खासदार श्री.संजय मंडलिक, खासदार श्री.धैर्यशील माने, कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आम.श्री.प्रकाश आबिटकर, मा.आम.श्री.चंद्रदीप नरके, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारूगले, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख प्रा.शिवाजीराव पाटील, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, संजय संकपाळ आदी उपस्थित होते.