no images were found
वर्षा उसगांवकरने सांगितला नसीरुद्दीन शाह सोबत काम करण्याचा अनुभव
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शोच्या हास्यजत्रेत या वीकएंडला अनुभवा 80 च्या दशकाच्या ग्लॅमरची चमक! या रविवारच्या खास भागात 80 च्या दशकातील अभिनेत्री संगीता बिजलानी, वर्षा उसगांवकर आणि मंदाकिनीचे स्वागत करण्यात येईल. या अभिनेत्री आपले काही खास अनुभव शेयर करतील आणि त्यांच्या उपस्थितीत हास्य-विनोदाला उधाण आलेले दिसेल!
वर्षा उसगांवकरशी गप्पा मारताना कपिल शर्मानेतिला ‘हस्ती’ चित्रपटासाठी तिने नसीरुद्दीन शाह सोबत काम केले, त्यावेळेसच्या अनुभवाबद्दल विचारले.त्या आठवणी जाग्या करत तिने नसीरुद्दीन शाह सोबत डान्सकेल्याची एक गंमतीदार आठवण सांगितली. ती म्हणाली, “नसीरुद्दीन शाहला पाहून मला त्याच्या सगळ्या आर्ट फिल्म्स आठवल्या. मला वाटले, ‘वा! त्याने इतक्या अर्थपूर्ण आर्ट फिल्म्स केल्या आहेत आणि आता तो माझ्यासोबत डान्स करणार आहे.’ मी त्याच्या बरोबर दोन चित्रपट केले- शिकारी आणि हस्ती. हस्तीचे शूटिंग ऊटीमध्ये सुरू होते आणि आम्ही दोघे एक डान्सचे दृश्य करत होतो.मला तो डान्स करताना खूप मजा आली आणि त्यालाही जरा देखील अवघडल्यासारखे झाले नाही. त्यावेळी मी त्याला थोडा डान्स शिकवला. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव फार छान होता. मला तर फार भारी वाटत होते, कारण मी एका महान नटासोबत काम करत असल्याची जाणीव मला होती. त्याची नायिका होता आले ही माझ्यासाठी सद्भाग्याची गोष्ट होती. त्याच्या सोबत काम करण्याचा अनुभव लक्षणीय होता.”
वर्षा पुढे सांगते, “नसीरुद्दीन शाहच्या एका गोष्टीमुळे मी फार प्रभावित होते आणि ती म्हणजे, तो अजूनही रंगमंचाशी निगडीत आहे. मी स्वतः रंगमंचावरून आले आहे, त्यामुळे त्या मंचांची जादू मला माहीत आहे. मी देखील आजवर नाटकांशी निगडीत राहिले आहे.नसीरुद्दीनबद्दल मला या गोष्टीचे विशेष कौतुक वाटते की, इतके यश मिळवून देखील त्याला कधीच समाधान वाटत नाही. आणि नाटकाशी आपली नाळ जोडून ठेवायला त्याला आवडते. ही गोष्ट फारच कौतुकास्पद आहे की, चित्रपटात अपार यश मिळवून देखील नाटकाशी त्याने आपले नाते घट्ट ठेवले आहे.”