
no images were found
खासगी बस-मोटारीच्या भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार
विटा– महाबळेश्वर राज्य मार्गावर भरधाव खासगी बस व मोटारीच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातातून सदानंद दादोबा काशीद हे बचावले असून ते जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरुन आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी – आज सकाळच्या सुमारास विटा महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताराच्या दिशेने विट्याकडून ट्रॅव्हल्स निघाली होती. त्याचवेळी साताराकडून येणारी कार विटाच्या दिशेने येत होती. शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे उताराच्या ठिकाणी वाहनांची धडक झाली. यात कारमधील सदानंद काशीद हे जखमी झाले. तर त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी आणि मालाड येथील बदली मोटार चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले.
हा अपघात इतका भीषण होता की धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी सदानंद काशीद यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचे वृत गव्हाण गावात समजताच गावावर शोककळा पसरली. ऐन यात्रेच्या कालावधीत काशीद कुठुंबियांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे