no images were found
अजित पवार शरीराने वज्रमूठसभेत पण मनाने कुठे? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
तीन पक्ष येऊन आज गर्दी करतायेत, पण तो केवळ केविलवाणा प्रयत्न!; शिवसेनेच्या नेत्याचं मविआच्या वज्रमूठ सभेवर टीकास्त्र
छत्रपती संभाजीनगर: मागच्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात सातत्याने हा विषय चर्चेत येत आहे. अशात अजित पवार यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिलं आहे. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच असणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पण अजित पवार भाजपसोबत येतील, असा दावा युतीकडून केला जात आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अजित पवार चार दिवसात मोठा निर्णय घेतील असं म्हटलं आहे. तसंच मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. त्यावरून भाजपसह शिंदेंच्या गटातील नेत्यांनी मविआवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केलीय. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलं की, या पूर्वी सुद्धा त्या मैदानावर बाळासाहेबांनी सभा घेतल्या आहे, त्या सभा सोबत आजची सभा बरोबरी करता येणार नाही.
अजित पवार यांच्याबद्दल संजय शिरसाट यांनी धक्कादायक असं विधान केलंय. अजित पवार यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल, त्यांना सभेत खुर्ची आहे की नाही माहीत नाही. ते आले तर काय बोलणार माहीत नाही. ते मनापासून सभेत नाही तर शरीराने असतील आणि ते मनातून कुठे असेल ते 4 दिवसात कळेल, सगळ्यांना दिसेल. अजित दादा सगळे विषय हसून खेळून टोलवतात आहे, याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे ते निर्णय घेतील 100 टक्के. तीन पक्ष येऊन आज गर्दी करताय आणि आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करताय. सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे ते कळत नाही, सभेमुळे वातावरण बदलते हा समज चुकीचा आहे, शिवसेना प्रमुख मला म्हणायचे गर्दी होते मग मतदान का मिळत नाही, त्यामुळं फार लक्ष द्यायची गरज नाही. सभेचा धुरळा उडणार नाही आणि थोडा बहुत उडाला तर आम्ही पाणी मारून शांत करू असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.