no images were found
राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर शिवसेनेकडून साखर पेढे वाटून आनंदोत्सव
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : जनतेला समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातील समाधी स्थळाच्या सुशोभीकरणास मंजूर रु.१० कोटींच्या निधीचा विषय गेली अनेक दिवस चर्चेचा विषय होता. काही नियमावलीमुळे सदर निधी वर्ग करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. यातील अटी शिथिल करून राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून रु.९ कोटी ४० लाखांचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळाप्रमाणे महाराजांच्या जन्मस्थळाच्या रखडलेल्या कामांचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. राज्य शासनाकडून समाधी स्थळास मंजूर केलेल्या निधीबाबत शिवसेनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जयघोष करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या हयातीत आपली समाधी सिद्धार्थनगर, नर्सरी बाग येथे, करावी असे म्हंटल्याची नोंद आहे. महाराजांची इच्छा व शाहू प्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करून महानगरपालिकेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळ नर्सरी बागेत उभारले आहे. याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी महानगरपालिकेने रु.१० कोटींचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला होता. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे हा निधी मंजुरीचा प्रस्ताव प्रलंबित होता. वास्तविक, पाहता सदर जागा खासगी आहे. त्यामुळे शासनाला खाजगी जागेत निधी देणे नियमात बसत नव्हते. त्यामुळे निधी वर्ग करण्यास अडचणी येत होत्या. परंतु, दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना पालकमंत्री ना.दीपक केसरकर, माझ्यासह शिवसेनेच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रखडलेल्या समाधी स्थळाच्या कामाकडे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे लक्ष वेधले आणि कोल्हापूर वासीयांची आणि समस्त शाहू प्रेमींची या स्मारकाबद्दलची भावना पटवून दिली. यावर तात्काळ खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री.भांगे यांच्याशी चर्चा करून तात्काळ खाजगी जागेची अट शिथिल करून खासबाब म्हणून निधी मंजुरीकरिता प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला. यास तात्काळ मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी मंजुरी देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तात्काळ राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून रु.९ कोटी ४० लाखांचा निधी विशेष बाब म्हणून निधी वर्ग करण्यास मंजुरी दिली. याबद्दल मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब, उप-मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष सुरु होत असून आगामी काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाप्रमाणेच महाराजांच्या जन्मस्थळासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, मा.नगरसेवक शशिकांत पाटील, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, शहरसमन्वयक सुनील जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, समन्वयक श्रीमती पूजाताई भोर, शहरप्रमुख सौ. पवित्रा रांगणेकर, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, तुकाराम साळोखे, युवा सेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जून आंबी, रिक्षासेना शहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, इंद्रजीत आडगुळे आदी शिवसेना, महिला आघाडी, अंगीकृत सेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.