
no images were found
अंमलीपदार्थांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
मुंबईः मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. वरळी, घाटकोपर आणि वांद्रे येथील अंमली पदार्थ विरोधी सेलने ३ ठिकाणांहून ५ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे.मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाची ही मोठी कारवाई आहे. या छाप्यात पथकाकडून 40 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
वरळी कक्षाने गोरेगाव येथील संतोषनगर परिसरात संशयावरून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७५ ग्रॅम एमडी जप्त केले. त्याची किंमत १५ लाख रुपये आहे. तिन्ही आरोपींना अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदयांतर्गत अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत एएनसीच्या घाटकोपर कक्षाने माहिम पश्चिम येथील कासालुना इमारतीजवळून ६८ ग्रॅम एमडीसह २४ वर्षीय तरूणाला पकडले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत १३ लाख ६० हजार रुपये आहे. याप्रकरणी घाटकोपर कक्षात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.
तिसऱ्या कारवाईत वांद्रे कक्षाने सायन-माहिम जोड रस्ता येथून दोन तरूणांना ५२ ग्रॅम एमडीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत १० लाख ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी वांद्रे कक्षात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ (क) सह २२ (क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी २१ व २८ वर्षांचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.