
no images were found
पानसरे हत्या प्रकरणी पोलीस संरक्षण मिळावे – अधिवक्ता समीर पटवर्धन
सांगली – कोल्हापूर येथील अधिवक्ता मयत कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आरोपींकडून अधिवक्तापत्र घेतले असून त्याकामी पोलीस संरक्षण मिळावे, अशा मागणीचे निवेदन अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी २४ एप्रिल या दिवशी येथील पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना दिले. या वेळी सांगली येथील अधिवक्ता अमोघवर्ष खेमलापुरे, अधिवक्त्या प्रीती पाटील उपस्थित होत्या. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली म्हणाले की, या निवेदनासंदर्भात चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर येथील अधिवक्ता गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक आरोपींच्या वतीने मी अधिवक्तापत्र घेतले असून आरोपी क्रमांक १ याला अटक झाल्यापासून म्हणजे वर्ष २०१५ पासून मी काम पहात आहे. सदर कामी आरोपी क्रमांक १ याला अटक झाल्यानंतर त्याचे अधिवक्तापत्र घेण्यास कोल्हापूर अधिवक्ता संघटनेने नकार दिला होता. सर्व आरोपींच्या रिमांडवेळी माझ्यावर प्रचंड दबाब आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सुनावणीस कोल्हापूर न्यायालयात गेलो असता माझ्या गाडीचा पाठलाग करणे, न्यायालयातून बाहेर येतांना जोरदार घोषणा देणे, माझ्या गाडीवर दगडफेक करणे असे प्रकार झालेले आहेत.
एकूणच या सर्व प्रकरणात सर्व बाजूंनी माझ्यावर दबाब आहे, कारण आरोपी सर्व कामात थोड्या फार फरकाने तेच असल्याने मला कर्नाटकातील धारवाड आणि बंगळुरू येथेही जावे लागते, तसेच पुणे येथील सुनावणींना जावे लागते. अशातच गौरी लंकेश प्रकरणात मडिकेरी येथील माझे सहकारी अधिवक्ता कृष्णमूर्ती याच्यावर गोळीबार झाला असून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे पोलिसांकडून पानसरे हत्या प्रकरण संपेपर्यंत सरकारी खर्चाने पोलीस संरक्षण मिळावे.