no images were found
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सामाजिक पर्व अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘क्रांतीचा साक्षीदार’ हा एकपात्री प्रयोग रुपेश निकाळजे यांनी सादर केला. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, शिवाजी विद्यापीठाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जगन कराडे, रुपेश निकाळजे माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
एकपात्री प्रयोगात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळापूर्वीची, समकालीन व त्यानंतरची सामाजिक परिस्थिती- यामध्ये जातीधर्मामध्ये होणारा भेदभाव, पिण्याच्या पाण्यासाठी बाबासाहेबांनी केलेली चवदार तळ्याची क्रांती, नाशिक काळाराम मंदिर प्रवेश, भारतीय संविधानाची निर्मिती, भारताचे सार्वभौम, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये समाजामध्ये रुजविण्यासाठी डॉ. बाबासाहेब यांनी केलेले कार्य आदी विविध प्रसंगांवर सादरीकरण केले.
कोल्हापूर मधील विविध महाविद्यालय, शासकीय वसतीगृहे, आश्रमशाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी या एकपात्री प्रयोगाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमास जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक , सहायक आयुक्त समाजकल्याण अधिनस्त शासकीय वसतिगृहातातील , शासकीय निवासी शाळा, विजाभज आश्रमशाळा येथील विद्यार्थी, शिक्षक तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, समतादूत यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी केले तर आभार सचिन कांबळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कल्पना पाटील व प्रताप कांबळे, रोहिणी लव्हटे, निलम गायकवाड, सुरेखा डवर यांनी परिश्रम घेतले.