no images were found
सचिन आणि सुप्रिया पिळगांवकरची प्रेमकहाणी झाली जगजाहीर
एका धमाल अनुभवासाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शोच्या आगामी भागात पिळगांवकर परिवार हाजरी लावणार आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेता सचिन पिळगांवकर, त्याची मोहक पत्नी सुप्रिया पिळगांवकर आणि त्यांची प्रतिभावान मुलगी श्रीया पिळगांवकर या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. या भागात त्या तिघांमधील घट्ट नातं, या व्यवसायातील त्यांचा प्रवास आणि एकमेकांबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसून येईल.
गप्पांच्या ओघात होस्ट कपिल शर्मा सुप्रियाला विचारेल की, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटासाठी त्यावेळी सचिन खरोखर एखादी अभिनेत्री शोधत होता की, स्वतःसाठी कुणी मुलगी शोधत होता? त्यावर सुप्रियाचे उत्तर असेल, “त्याला हा चित्रपट बनवायचा होता, पण त्याला हवी तशी अभिनेत्री सापडत नव्हती. त्यामुळे त्याने सगळ्यांना अभिनेत्रीचा शोध घेण्याचे काम सोपवले होते. त्यावेळेस मी मुंबई दूरदर्शनच्या एका छोट्या कार्यक्रमात परफॉर्म करत होते. माझ्या सासूबाई तेव्हा तो कार्यक्रम बघत असत. त्यांनी मला बघितले आणि त्यांना असे वाटले की त्यांना अपेक्षित भूमिकेसाठी मी अगदी अनुरूप आहे. त्यांनी सचिनला माझ्याबद्दल सांगितले आणि ते देखील त्यांच्या आईच्या मताशी सहमत झाले. त्या कार्यक्रमाच्या श्रेय नामावलीतून त्यांना माझे नाव समजले. मी गोव्याची आहे, हे समजल्यावर माझ्या सासुबाईंना वाटले की, जोडीदार म्हणून मी सचिनला शोभून दिसेन कारण ही मुलगी देखील अनुरूप जोडीदाराच्या शोधातच असेल. असे बोलून त्यांनी सचिनच्या डोक्यात हा विचार टाकला. या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेस आमच्यामध्ये तसे काहीच नव्हते, पण चित्रपट संपला, पूर्ण झाला, त्यानंतर सचिनने मला लग्नाची मागणी घालण्याचे ठरवले कारण त्याला भीती वाटत होती की, आधीच विचारले तर कदाचित ही मुलगी चित्रपट सोडून जाईल. त्यामुळे त्याने चित्रपट पूर्ण होण्याची वाट बघितली.”
याला पुस्ती जोडत सचिन सांगेल की, भारतात रंगीत टेलिव्हिजनवर दिसलेला तो पहिला माणूस होता, जो ‘गीत गाता चल’ चित्रपटात टीव्हीवर दिसला होता. तो म्हणाला की, सुप्रियाने त्याला पहिल्यांदा पडद्यावरच बघितले होते. यावर सुप्रिया म्हणाली की, जेव्हा तिने पहिल्यांदा रंगीत टीव्हीवर सचिनला बघितले, तेव्हा त्या दिवशी तो तिच्या स्वप्नात देखील आला होता. त्यामुळे तिला आता असे वाटते की, त्यांची जोडी स्वर्गातूनच जुळवण्यात आली होती.”