
no images were found
महिला व बालविकास विभागाच्या पुढाकाराने महिलांच्या समस्या सोडविणार- मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, : राज्यातील महिला सक्षमीकरणाचा निर्धार करून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. शासनाचा महिला व बालविकास विभाग व बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई क्षेत्रातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी “सरकार आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे “सशक्त भारत – समृद्ध नारी” हे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार कार्यरत आहे.
महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये महिला व बालविकास विभागाचा मंत्री म्हणून मी नेहमीच कटिबद्ध आहे, असे मत मंत्री श्री. लोढा यांनी व्यक्त केले आहे. तसेच मुंबईतील सर्व माता-भगिनींनी या उपक्रमात सहभागी व्हावे. या उपक्रमाच्या माध्यमातून समस्या राज्य सरकार समोर मांडाव्यात, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.
‘सशक्त नारी – समृद्ध भारत’ या मूलमंत्राला समोर ठेऊन शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ‘सरकार आपल्या दारी’ (फक्त मातृशक्तीसाठी) हा अनोखा उपक्रम येत्या १९ एप्रिलपासून संपूर्ण मुंबईत राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात दुपारी तीन ते सायंकाळी ५.३० या वेळेत राज्य सरकारमार्फत महिलांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी काम केले जाणार आहे. यासाठी विभागाचे अधिकारी देखील सहकार्य करणार असून, महिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जावून माहिती भरण्यास सांगण्यात आले आहे.