no images were found
न्यू पॉलिटेक्निकमध्ये रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये रक्तदान व आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले. न्यू पॉलिटेक्निकमधील रोटरॅक्ट क्लब ऑफ न्यू पॉलिटेक्निक आयोजित या उपक्रमांत संस्थेच्या शाखा असलेल्या न्यू काॅलेज ऑफ फार्मसी व न्यू माध्यमिक विद्यालय संयुक्तरित्या सहभागी होते. रोटरॅक्ट क्लब ऑफ न्यू पॉलिटेक्निक हा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर राॅयल्सशी संलग्नित आहे.
रक्तदान शिबिरात तिन्ही शाखांमधील स्टाफ आणि काॅलेजमधील विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. या शिबीरात संजीवन ब्लड सेंटरने आपली सेवा दिली.
त्याचबरोबर, सर्व विद्यार्थिनींसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले होते. यामध्ये हिमोग्लोबीन तपासणी, लोहगोळ्या व सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. यावेळी डाॅ. भारती सुर्यवंशी यांचे विद्यार्थिनींसाठी ‘मासिक पाळी आरोग्य व व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. मासिक पाळीवेळी त्रास होवू नये यासाठी घ्यावी लागणारी काळजी आणि त्रास उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरच्या संचालिका व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर राॅयल्सच्या अध्यक्षा सविता पाटील यांनी राष्ट्राच्या जडणघडणीतील नारीशक्तीचे महत्वपूर्ण योगदान अधोरेखित केले. आज एक महिला आपल्या देशाची धुरा वाहत असताना भविष्यातील नारीचे आरोग्य उत्तम असणे अत्यंत गरजेचे आहे हे नमुद केले.
न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी रक्तदानाचे महत्व स्पष्ट करताना रक्तदात्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी दशेतच सामाजिक बांधिलकी जपणारे हे विद्यार्थी सुजाण नागरिक घडतील असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ होरायझनचे अध्यक्ष संजय साळोखे, रोटरियन ॲन्जेला नोरेंज, रोटरीयन श्रेयस चव्हाण, सिद्धार्थ जाधव, न्यू काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डाॅ. रविंद्र कुंभार, न्यू माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक उदयकुमार संकपाळ, रजिस्ट्रार प्रा. नितीन पाटील, प्रा. सुभाष यादव, स्टाफ, विद्यार्थीनी उपस्थित होते. या उपक्रमांसाठी प्रा. रविंद्र यादव, प्रा. कु. माधुरी पाटील यांनी विशेष कष्ट घेतले.