no images were found
महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांचा आकडा 11 वर; मुख्यमंत्र्यांसह, अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडून रुग्णांची विचारपूस
मुंबई (खारघर): आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ११ वर गेला आहे. १९ जणांवर अद्यापही उपचार सुरु असून ८ जणांना उपचारांनंतर सोडून देण्यात आलं. तर अजूनही अनेकजण अत्यस्वस्थ आहेत. नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात या श्रीसेवकांवर उपचार सुरू आहेत. कडक उन्हात दोन तास बसल्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने या श्रीसेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यातील ११ जण दगावले. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ८ वाजता आजारी श्री सदस्यांना भेटण्यासाठी कामोठेतील एमजीएम रुग्णालयात पोहोचले. यावेळी उपाचप घेत असलेल्या रुग्णांची संवाद साधला, त्यांची विचारपूस केली. दरम्यान या कार्यक्रमाद मृत पावलेल्या श्री सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली तसंच आजारी असलेल्यांचा उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार असंही जाहीर केलं. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली. याशिवाय एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले. तसंच रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.मुख्यमंत्र्यांनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यासह अरविंद सावंत आणि विनायक राऊत हे देखील एमजीएम रुग्णालयात पोहोचले. इथे त्यांनी आजारी असलेल्यांची विचारपूस केली.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. परंतु या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला.
एमजीएम हॉस्पिटलमध्ये 01,भारती मेडिकल हॉस्पिटलमध्ये 02, टाटा हॉस्पिटलमध्ये 08 असे एकूण 11 मृतांची नावे. तुळशीराम भाऊ वागडे वय 58, जांभूळ विहीर ता. जव्हार, जयश्री जगन्नाथ पाटील वय 54, रा. वारळ पो. मोदडी ता. म्हसळा, महेश नारायण गायकर वय 42, रा. मेदडू ता. म्हसळा, मंजुषा कृष्णा भोगडे, रा. भुलेश्वर मुंबई, भीमा कृष्णा साळवे, वय 58, रा. कळवा ठाणे, सविता संजय पवार, वय 42, रा. मंगळवेढा, सोलापूर, स्वप्नील सदाशिव किणी, वय 32, रा. विरार, पुष्पां मदन गायकर, वय 63. कळवा, ठाणे, वंदना जगन्नाथ पाटील, वय 62, रा. माडप. ता. खालापूर, कलावती सिद्धराम वायचल, रा. सोलापूर,एक अनोळखी आहे.