no images were found
सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद नाहीत-सुमंत भांगे
मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर चालु असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत, मात्र राज्यातील सर्व सामान्य जनतेमध्ये/समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी खोटी व दिशाभूल करणारी माहिती ठराविक संघटना व लोकांकडून दिली जात असून आंदोलने करण्यात येत आहेत. सचिव, सामाजिक न्याय विभाग यांच्या विरोधात निवेदने दिले जात आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रसार माध्यमातून देखील जनतेची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करण्यात येत आहेत. हे सर्व आरोप सचिव सुमंत भांगे यांनी फेटाळले असून त्यात कोणत्याही स्वरूपाचे तथ्य नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. खोटी व सामाजिक न्याय विभागाची बदनामी करणारी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा खुलासा सचिव श्री सुमंत भांगे यांनी केला आहे.
सामाजिक न्याय विभागात वर्षानूवर्षे मक्तेदारी निर्माण करणारे ठेकेदार, भोजन पुरवठा करणारे ठेकेदार, तसेच विविध प्रशिक्षणाच्या सेवा देणाऱ्या संस्था, यांचे करार संपुष्टात आले असल्याने , तसेच विभागाने केलेल्या स्थानिक स्तरावरील चौकशीत भोजन ठेकेदार दोषी आढळल्याने त्यांचा भोजन ठेका रद्द करुन त्यांच्याविरुद्ध काही ठिकाणी गुन्हे दाखल करून, त्यांना काळ्यायादीत टाकण्याची कार्यवाही प्रस्तावित केल्याने या ठेकेदारांकडून विभागाची व सचिवांची बदनामी करुन प्रतिमा मलिन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र सामाजिक न्याय विभाग त्यांच्या दबावाला बळी पडणार नसल्याचेही सचिव, श्री.सुमंत भांगे यांनी स्पष्ट केले आहे.