no images were found
तुझेच मी गीत गात आहे मालिकेत उर्मिला कानेटकरची होणार धमाकेदार एण्ट्री
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेत स्वराज आणि मल्हारचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मल्हारच आपले वडील आहेत ही गोष्ट स्वराजला कळली आहे. इतकी वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या स्वराज म्हणजेच स्वराच्या आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मल्हारला ही गोष्ट स्वराज सांगू इच्छित असला तरी नियतीच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी आहे. मल्हारला बाबा अशी हाक मारण्याचा क्षण आयुष्यात येण्यापूर्वीच स्वराजने अपघातात त्याचा आवाज गमावलाय. स्वराज त्याच्या मनातली भावना कशी व्यक्त करणार हे मालिकेतील पुढील भागांमधून उलगडेल. स्वराज आणि मल्हारच्या नात्यात हे भावनिक चढउतार सुरु असतानाच मालिकेत उर्मिला कानेटकरची एण्ट्री होणार आहे. उर्मिलाने मालिकेत स्वराच्या आईचं म्हणजेच वैदेही हे पात्र साकारलं होतं. मालिकेत वैदेहीचं गंभीर आजारामुळे निधन दाखवण्यात आलं असलं तरी स्वराच्या आठवणींमधून उर्मिलाचं दर्शन प्रेक्षकांना होत राहिलं. आता उर्मिला या मालिकेत एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंजुळा सातारकर असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तिच्या येण्याने मालिकेत नवं वळण येणार आहे.