no images were found
हम करे सो कायदा’ चालणार नाही; पालकमंत्री चंद्रकात पाटील
पुणे : बालभारती ते पौड फाटा दरम्यानच्या नियोजित रस्त्याला विरोध करणाऱ्यांचे मत आणि म्हणणे विचारात घेऊन त्यावर मार्ग काढून विकास कामे करावी लागतील. मात्र, ‘हम करे सो कायदा’, असे चालणार नाही, अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी रस्ता नकोच, अशी भूमिका घेणाऱ्यांना टोला लगावला.
प्रस्तावित बालभारती ते पौड फाटा रस्त्यावरून पर्यावरणवादी आणि महापालिका यांच्यात मतमतांतरे आहेत. वेताळ टेकडीवरून हा रस्ता जात आहे. त्यामुळे टेकडी धोक्यात येईल, असे काही संस्थांचे म्हणणे आहे. याविरोधात पर्यावरणवादी संस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी रस्ता तयार करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या रस्त्याला पर्यावरण प्रेमी नागरिकांचा विरोध वाढत असताना भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही नागरिकांना पाठिंबा देत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की प्रशासन हे त्यांच्या नियोजनानुसार काम करते. पण लोकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी पर्यावरणवादी नागरिकांशी संवाद साधणार आहे. लोकशाहीत ‘हम करे सो कायदा’ चालत नाही. विकास करायचा असेल, तर पर्यावरणवाद्यांना समजावून का होईना पुढे जाण्यासाठी पर्याय नसतो. हा प्रकल्प कोणाच्या हितासाठी करण्यात येत आहे, असे नाही. हा रस्ता झाल्याने अनेकांना फायदा होईल.
कोथरूडला जाण्यासाठी रस्ता हवा, अशी आमचीही मागणी आहे. मात्र, वेताळ टेकडी फोडून आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून, पुणेकरांचे नुकसान होणार असल्याने आमचा या नियोजित रस्त्याला विरोध आहे.