no images were found
हनुमान जयंतीचा महाप्रसाद, ५० हून अधिक जणांना विषबाधा
नाशिकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव येथे ५० ते ६० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाली आहे. ठाणगाव येथे हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त गावकरी यांच्या तर्फे करण्यात आले होते.सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान काल्याचे किर्तन होते. या महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे गावकऱ्यांकडून समजले आहे. काही जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तर काहींना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. परंतु यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
वैद्यकीय अधिकारी सदर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस निरीक्षक वाघ यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाप्रसादाचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र आज गुड फ्रायडे दिनानिमित्त सुट्टी असल्याने सर्वच आरोग्य कर्मचारी रुग्णालयात उपस्थित नव्हते. रुग्णांवर उपचार सुरू असून विषबाधेच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गावात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घेतला. गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर अनेकांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्यांनी तातडीने ठाणगाव येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात धाव घेतली. असे एक एक करून गावातील आरोग्य केंद्रात जवळपास ५० ते ६० जणांना अन्नातून विषबाधा झाली रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.