no images were found
जमास्वीकृती विभागाचा ऐतिहासिक महत्त्वाचा दिवस
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागांतर्गत कार्यरत जमास्वीकृती कक्षाच्या इतिहासात कालचा बुधवार (दि. ५ एप्रिल) हा ऐतिहासिक महत्त्वाचा ठरला. विद्यापीठाच्या इतिहासात जमास्वीकृती कक्षामध्ये काल सर्व (१०० टक्के) व्यवहार ऑनलाईन झाले. एकही व्यवहार रोखीने करण्यात आला नाही. या निमित्ताने कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी जमास्वीकृती विभागात जाऊन सर्व कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले.
शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त व लेखा विभागाने विद्यार्थ्यांसह विविध घटकांच्या सोयीसाठी ऑनलाईन रिसीट पोर्टलची निर्मिती केली. त्या अनुषंगाने अधिकार मंडळाच्या ठरावानुसार शिवाजी विद्यापीठ परिसरातील सर्व अधिविभागांद्वारे विद्यापीठाच्या जमास्वीकृती विभागात रोखीने, धनादेशाद्वारे तसेच बँक पावतीद्वारा केल्या जाणाऱ्या पावत्या दि. ३१ डिसेंबर २०२२ पासून बंद करण्यात आल्या. आणि ३१ जानेवारी २०२३ पासून महाविद्यालये व इतर घटक यांच्याकरिता सदर सुविधा बंद करण्यात आली. सर्व संबंधितांना ऑनलाईन रिसिट पोर्टलचा वापर करूनच सर्व व्यवहार आणि पावत्या ऑनलाईन करण्याबाबत अवगत करण्यात आले. दि. ४ एप्रिलपर्यंत ही व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर चालवून यशस्वी करण्यात आली. ५ एप्रिल २०२३ रोजीचे सर्व व्यवहार आणि पावत्या ऑनलाईन स्वरुपातच झाले.
आता विद्यापीठाशी संबंधित कोणताही आर्थिक व्यवहार प्रत्येक विद्यार्थी कोणत्याही ठिकाणाहून संगणक अथवा मोबाईलवरुन ऑनलाईन स्वरुपात करू शकणार आहे. तथापि, विद्यापीठात येऊन व्यवहार करू इच्छिणाऱ्यांसाठी जमास्वीकृती विभागामध्ये पाच संगणक उपलब्ध करण्यात आले आहेत. या सुविधेसही काल कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील जमास्वीकृतीचे शंभर टक्के व्यवहार ऑनलाईन करण्याची कामगिरी यशस्वी करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी प्रत्यक्ष विभागात जाऊन अभिनंदन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, उपकुलसचिव रमेश लिधडे, सहाय्यक कुलसचिव सुरेश बंडगर, अधीक्षक सुभाष संकपाळ, सतीश हुक्केरी, शोभा पुरेकर, वंदना गुरव, जयश्री माने, सुजीत सकटे, दीपा चौगुले, रुपाली सणगर, काजल मधाळे, विकास सावंत आदी उपस्थित होते.