no images were found
गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे माजी उपसरपंचांचा गव्याच्या हल्ल्यात आज मृत्यू झाला.ही घटना दुपारी घडली. माणिक बळवंत पाटील (वय ५० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या छातीत गव्याचे शिंग घुसले होते.त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहिती वरून दुपारी अडीचच्या सुमारास माणिक पाटील त्यांच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते. वैरण कापत असताना बिथरलेला गवा अचानक समोर आला आणि त्याने माणिक पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या छातीत गव्याने शिंग खुपसले. आरडाओरडा ऐकून आसपासच्या शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी त्यांना सीपीआर येथे हलवले; पण तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, हल्ल्यानंतर गवा त्याच शेतात थांबून होता. पळापळीने दमछाक झालेला गवा सुमारे तीन तास शेतातच बसून होता. सायंकाळी वन विभागाने रेस्क्यू फोर्सच्या मदतीने गव्याला डोंगरात हुसकावून लावले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला.