no images were found
विद्यापीठातर्फे विशेष स्वराज्य रॅलीसह सामूहिक राष्ट्रगीत गायन
कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्वराज्य महोत्सव या निमित्ताने आज शिवाजी विद्यापीठात विशेष स्वराज्य रॅलीसह सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. विद्यार्थी-विद्यार्थिनींसह सर्वच घटकांचा या उपक्रमात सहभाग राहिला. आजादी का अमृतमहोत्सव, शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव आणि स्वराज्य महोत्सव अशा संयुक्त निमित्ताने विद्यापीठातर्फे अनेकविध उपक्रमांचे गेल्या पंधरवड्यात आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना सर्वच घटकांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्वराज्य महोत्सवाच्या अंतिम पर्वामध्ये आज सकाळी १० वाजता विशेष स्वराज्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड रिसर्च अर्थात सायबर संस्थेपासून या रॅलीस प्रारंभ झाला. चिखली येथील आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वराज्य ज्योत घेऊन रॅलीत सहभागी झाले. ही रॅली विद्यापीठाच्या एनसीसी भवन येथील द्वार क्रमांक ८ येथे येऊन तेथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा पूर्ण करून मुख्य प्रशासकीय भवनापासून राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात रॅलीचे आगमन झाले. संपूर्ण रॅलीदरम्यान सहभागी विद्यार्थी राष्ट्रभक्तीपर घोषणा देत होते. त्याचप्रमाणे राष्ट्रभक्तीपर गीतेही वाजविण्यात येत होती. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या नेतृत्वाखाली रॅली संपन्न झाली. दरम्यान, आज दुपारी राष्ट्रीय सेवा योजना आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू सभागृहात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.