Home शैक्षणिक शाहू महाराजांच्या जडणघडणीत गुरू फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा: डॉ. यशवंतराव थोरात

शाहू महाराजांच्या जडणघडणीत गुरू फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा: डॉ. यशवंतराव थोरात

2 second read
0
0
43

no images were found

शाहू महाराजांच्या जडणघडणीत गुरू फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा: डॉ. यशवंतराव थोरात

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या जडणघडणीत त्यांचे गुरू सर स्टुअर्ट फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि राजर्षी शाहू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘राजर्षी शाहू आणि युरोपियन विचारविश्व’ या विषयावर डॉ. थोरात बोलत होते.

डॉ. थोरात यांनी आपल्या व्याख्यानामध्ये शाहू महाराजांची युरोपियन विचारविश्वाच्या अंगाने मांडणी करीत असताना त्यांचे गुरू स्टुअर्ट फ्रेझर यांना केंद्रस्थानी ठेवले. ते म्हणाले, वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी भारतीय लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये रुजू झालेल्या फ्रेझर यांच्यावर राजकुमारांच्या ट्युटरशीपची जबाबदारी सोपविण्यात आली. एकीकडे युरोपातील मुक्त विचारांचे वारे तर दुसरीकडे वसाहतवादी भूमिकेतून भारतामध्ये करावयाचा वावर अशा दुहेरी भूमिकेतून फ्रेझर यांच्यासह आयसीएसमधील सर्वच अधिकाऱ्यांना काम करावे लागत असे. फ्रेझर यांनी तेरा वर्षांमध्ये अवघ्या तीन राजकुमारांना शिकविले. त्यामध्ये शाहू महाराजांसह भावनगरचे भावसिंगजी महाराज आणि म्हैसूरचे कृष्णराज वाडियार यांचा समावेश होता.

शाहू महाराजांवर त्यांच्या शिकवणीचा खूप मोठा प्रभाव पडला, हे गृहितक सिद्ध करताना डॉ. थोरात यांनी भावनगर आणि म्हैसूरच्या राजांनी केलेल्या कामगिरीचाही दाखला येथे दिला. ते म्हणाले, भावसिंगजी महाराजांचे इतिहासात एक प्रागतिक राजा म्हणून वर्णन आहे. अवर्षणाने ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला त्यांनी कर्जमाफी दिलीच, शिवाय, कर्जाचे अनुदानात रुपांतर करून त्यांना वाटप केले. मोठमोठे तलाव बांधले. लोकनियुक्त सरकार स्थापन केले. पहिले जनसभागृह प्रस्थापित केले. पहिली हरिजन शाळा सुरू केली. परदेशात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू केल्या. सहकारी चळवळीला पाठबळ दिले. बँकिंग क्षेत्राला चालना दिली. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रची प्रेरणाही त्यांचीच आहे. त्याचप्रमाणे म्हैसूरच्या कृष्णराज वाडियार यांना तर थेट महात्मा गांधी यांनीच राजर्षी अशी पदवी दिली होती. संस्थानात त्यांनी अनेक प्रशासकीय सुधारणा घडवून आणल्या. प्लेटोला अभिप्रेत असे त्यांचे आदर्शवत प्रजासत्ताक होते. म्हैसूर संस्थानाचा जगातले सर्वोत्कृष्ट प्रशासन असणारे संस्थान म्हणून गौरव करण्यात आला आहे. जलविद्युत प्रकल्प राबविणारे हे पहिले संस्थान. गरीबी हटविण्यासाठी योजना राबविण्यासह सार्वजनिक आरोग्यसुविधांची निर्मिती करण्यातही ते अग्रेसर होते. बालविवाह बंदी, मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार, विधवा कल्याणाच्या योजना राबविणारे तसेच पहिले विद्यापीठ स्थापन करणारे हे संस्थान आहे. या पार्श्वभूमीवर शाहू महाराज, भावसिंगजी महाराज आणि कृष्णराज महाराज या तिघांच्या कार्यामागील समप्रेरणा कोण असतील, तर ते म्हणजे त्यांचे गुरू सर स्टुअर्ट फ्रेझर होय, असे सिद्ध करता येऊ शकते. या विषयाच्या अनुषंगाने अधिक संशोधन होण्याची नितांत गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला व आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…