no images were found
श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करा ! हिंदू समाजाची मागणी
कोल्हापूर – (प्रतिनिधी) मूर्तीची झीज होत असल्याच्या कारणामुळे पुरातत्व खात्याच्या निर्देशानुसार वर्ष 1997 पासून श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 14 मार्च 2023 या दिवशी केंद्रीय पुरातत्व खात्याने श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची पहाणी केल्यानंतर मूर्ती सुस्थितीत असल्याचा निर्वाळा दिला आहे. सध्या मूर्तीच्या संवर्धनाची तात्काळ आवश्यकता नसून भविष्यात गरज लागल्यास संवर्धन करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले आहे. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत असल्याचा निर्वाळा पुरातत्व विभागाने दिल्याने आता मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू करण्यास कोणतीच अडचण नसावी. तरी या संदर्भात श्री महालक्ष्मी देवस्थानचे प्रशासक म्हणून जबाबदारी असलेले सध्याचे कोल्हापूरचे मा. जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात आढावा घेऊन सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी आणि देवीभक्तांच्या श्रद्धांचे संवर्धन कसे होईल, याचा विचार करून मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा तात्काळ चालू करावी, अशी मागणी ‘देवीभक्त सकल हिंदू समाजा’च्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या वेळी बोलताना ‘देवीभक्त सकल हिंदू समाजा’चे श्री. शरद माळी म्हणाले की, हिंदु धर्म शास्रानुसार मूर्तीमधील चैतन्य जागृत रहाण्यासाठी कोणत्याही देवतेवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू असणे अत्यावश्यक असते. ही परंपराच बंद असल्याने समस्त देवीभक्तांच्या श्रद्धांचे हनन होत आहे. श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर अभिषेक बंद असल्याने देवीभक्तांना घास घशाखाली जात नाही, अशी स्थिती आहे. अगोदर पुरातत्त्व खात्याने मूर्तीची स्थिती चांगली नसून, मूर्तीची झीज रोखण्यासाठी आणि मूर्ती संवर्धन होण्यासाठी मूर्तीस रासायनिक लेपन करण्याचा उपाय सांगितला होता. त्यानुसार पुरातत्व खात्याकडून रासायनिक लेपन करण्यातही आले; मात्र तरीही मूर्तीची झीज झाल्याच्या बातम्या आल्याने सर्व भक्तांना चिंता लागून राहिली होती. तसेच पुरातत्त्व खात्याच्या मूर्तीसंवर्धन ज्ञानावरही शंका निर्माण झाली होती. आता याच खात्याच्या नवीन अहवालाच्या संदर्भात मनात साशंकता असूनही जिल्हाधिकार्यांनीच निर्वाळा दिल्याने त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे प्रतिदिन लाखोंच्या संख्येने देवीदर्शनासाठी येणार्या भाविकांना न्याय मिळण्यासाठी माननीय जिल्हाधिकार्यांनी लवकरात लवकर पुढाकार घ्यावा, अशी ‘देवीभक्त सकल हिंदू समाजा’ची भूमिका आहे.
या प्रसंगी देवीभक्त सकल समाजाच्या वतीने श्री. शरद माळी, श्री. राजू यादव, श्री. सुमेध पोवार, श्री. रामभाऊ मेथे, श्री. शिवानंद स्वामी हे उपस्थित होते.