no images were found
सांगलीत पहिल्यांदाच रंगणार महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
सांगली : महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पहिल्यांदाच महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे.कारण, आता पुरुषांप्रमाणेच महिला कुस्तीपटूंसाठीही महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन सांगलीत केले जाणार आहे. मात्र याच्याआधी या स्पर्धा पुण्यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं होतं. आज पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत 23 आणि 24 मार्च रोजी होणार असून दहा वजनी गटासह खुल्या गटांतील महिला कुस्तीपटू यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटातील महिला पैलवान सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार असल्याची माहितीही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने दिली आहे. या कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी खिताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे उपस्थित होते.