
no images were found
कोल्हापूर हद्दवाढीवर महानगरपालिका निवडणूकीनंतर निर्णय : उदय सामंत
मुंबई – कोल्हापूर महानगरपालिकेच्या लगतच्या 42 गावांचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेत करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य जयश्री जाधव यांनी मांडली होती. शहराची हद्दवाढ 50 वर्षांपासून रखडली आहे. त्यातून राज्य व केंद्राच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत असल्याने विकास खुंटला आहे. महापालिकेने 2013 पासून 2021 पर्यंत चारवेळा हद्दवाढीचे प्रस्ताव सादर केले. मनपा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिगे, पीरवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, शिरोली, उंचगाव, शिंगणापूर, नागाव, वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी या 18 गावांसह गोकुळ शिरगाव व शिरोली या दोन एमआयडीसींचा समावेश आहे.
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात आणि हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येत नाही असा नियम असल्याने याबाबत निवडणूक झाल्यानंतर या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.