Home शैक्षणिक जनमानसातील इतिहासाची उपेक्षा दूर करणे आवश्यक: कुमार केतकर

जनमानसातील इतिहासाची उपेक्षा दूर करणे आवश्यक: कुमार केतकर

2 second read
0
0
38

no images were found

जनमानसातील इतिहासाची उपेक्षा दूर करणे आवश्यक: कुमार केतकर

कोल्हापूर, : जनमानसातील इतिहासविषयक उपेक्षेची भावना दूर करण्यासाठी त्यांच्या मनातील आदर्श व्यक्तीमत्त्वांच्या चरित्रांचा आधार घ्यायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, ‘पद्मश्री’ खासदार कुमार केतकर यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या वतीने डॉ. बाळकृष्ण लिखित ‘शिवाजी द ग्रेट’ या चार खंडांच्या महाग्रंथाचा मराठी अनुवाद ‘महान शिवाजी’ या नावाने करण्यात आला आहे. डॉ. जयसिंगराव पवार संपादक असून वसंत आपटे अनुवादक आहेत. याचा प्रकाशन समारंभ आज विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. केतकर बोलत होते. कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
इतिहासाच्या अभ्यासासाठी देशात पोषक वातावरण निर्माण होणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता प्रतिपादन करून केतकर म्हणाले, इतिहास हा मुद्दा आपण अत्यंत काळजीपूर्वक पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. ‘महान शिवाजी’ हा मूळ ग्रंथ ज्यांनी लिहीला, त्या डॉ. बाळकृष्ण यांचे मूळ मुलतान आहे, जे सध्याच्या पाकिस्तानात आहे. पण, ते पाकिस्तानात आहे म्हणून त्या ठिकाणाचा द्वेष करण्याचे कारण नाही. कारण इतिहासात मुलतान हे बौद्ध, जैन, हिंदू या सर्वच परंपरांचे पवित्र ठिकाण होते. तेथे त्यांच्या यात्रा भरत. पण इतिहासाच्या ज्ञानाअभावी ते आपल्या द्वेषाला कारण ठरते. तसे होऊ नये. तेथून महाराष्ट्रात येऊन डॉ. बाळकृष्ण महाराष्ट्रवासी झाले, ते कायमचेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते इतके प्रेमात पडले की, त्यांचे अस्सल साधनांनिशी चरित्र लिहीणे, हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले आणि पूर्णत्वास नेले. तत्कालीन व्यवस्थेमध्ये बाळकृष्णांना महाराज हे राष्ट्रीय चळवळीचे व स्वातंत्र्याचे प्रतीक वाटले असावेत, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ही त्यांची महाराजांवरील अपार निष्ठा होती. जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांत इतिहासाबद्दल आस्था निर्माण करीत नाही, तोवर बाळकृष्णांचे योगदान त्यांच्या ध्यानी येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य या संकल्पनेचे वेगळेपण व महत्त्व अधोरेखित करताना कुमार केतकर म्हणाले, सार्वभौम स्वराज्याची संकल्पना जागतिक स्तरावर सुद्धा अस्तित्वात नसण्याच्या कालखंडात शिवाजी महाराजांनी त्या संकल्पनेवर आधारित स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या प्रत्येक आदेशात, निर्णयात रयतेच्या हिताचा, कल्याणाचा विचार असे. महाराजांनी आपल्या साथीदारांना कधीही जहागिरी वाटल्या नाहीत. पिळवणुकीची, शोषणाची व्यवस्था त्यांनी स्वराज्यात कधीही निर्माण होऊ दिली नाही. आधुनिक सार्वभौम प्रजासत्ताकाच्या पद्धतीने राज्य चालविले. महाराजांनी लोकशाही मूल्ये स्वराज्यात ज्या पद्धतीने रुजविली, त्याला तोड नाही. तुलनेने लहान भूगोलावर महाराजांनी जे पेरले, त्याची दहशत त्याहून किती तरी पटींनी मोठ्या पातशाह्यांना होती. परकीय अभ्यासक, संशोधकांना त्यांचे आकर्षण होते. याचे कारण त्यांच्या राज्यपद्धतीमध्ये आहे. त्या दृष्टीने महाराजांचे रयतेच्या दृष्टीने काय योगदान होते, त्याची सातत्याने चर्चा होणे आवश्यक आहे. त्या काळात देशात अस्तित्वात असलेल्या ६५० संस्थानिकांपैकी एकाला सुद्धा आपले आरमार असावेसे वाटले नाही, पण शिवाजी महाराजांना सागरावरील अधिपत्याची आवश्यकता जाणवली होती, हे त्यांचे सर्वात मोठे वेगळेपण आहे. या सर्व बाबी समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी महाराजांचे विविध संदर्भसाधनांचा वापर करून पहिलेच विस्तृत चरित्र साकारले. महाराजांना ‘शिवाजी द ग्रेट’ असे संबोधून जगज्जेता एलेक्झांडरच्या तोडीचे त्यांचे कार्य असल्याचे प्रथमच निदर्शनास आणून दिले. शंभर वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचे नाव घेईल, तो ब्रिटीशांचा शत्रू, असे एक चित्र होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी थेट प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हातूनच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी करवून घेऊन त्यांच्याभोवतीचे हे अप्रसिद्धीचे कडे भेदले.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, डॉ. बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू ससंदर्भ सामोरे आणले आहेत. मराठा आरमाराचे जनक, हिंदी राष्ट्रीयत्वाचे प्रेरणास्थान आणि भारतीय स्वातंत्र्याचा ध्रुवतारा अशी महाराजांविषयीची वर्णने डच कागदपत्रांमध्ये सतराव्या शतकामध्येच करण्यात आली आहेत. ती बाळकृष्ण येथे सविस्तर मांडतात. इंग्लीश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज अशा सर्व प्रकारच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाराजांचे मोठेपण अधोरेखित केले आहे. सर्व बाजूंनी बलाढ्य शत्रूंनी घेरले गेले असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेणे हे विस्मयजनक असल्याचे निरीक्षण डच अभ्यासकांनी नोंदविल्याचे येथे दिसते. त्याचप्रमाणे महाराजांच्या जडणघडणीतील माता जिजाऊंचे योगदानही सांगितले आहे. त्याग, सदाचार, कर्तव्यकठोरता, आदर आणि सन्मान अशी उच्चतम मूल्ये जिजाऊंनी शिवरायांच्या मनात रुजविली. मृत्यूसमयी जिजाऊंनी शिवाजी महाराजांसाठी २५ हजार पागोडे बाजूला काढून ठेवल्याची नोंदही यामध्ये आढळते. यावेळी डॉ. पवार यांनी डॉ. बाळकृष्ण व छत्रपती राजाराम महाराज यांचे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमधील योगदानही अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी डॉ. पवार यांच्या मागणीचा संदर्भ घेऊन या वर्षीपासून डॉ. बाळकृष्ण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला सुरू करण्यात येईल, याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे ‘महान शिवाजी’ हा ग्रंथ राज्यातील सर्व विद्यापीठांना विशेष दूताकरवी पाठविण्यात येईल, असेही सांगितले.
यावेळी अनुवादक वसंत आपटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व डॉ. बाळकृष्ण यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुमार केतकर यांच्या हस्ते ‘महान शिवाजी’ या द्विखंडीय महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. देविकाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिक, अभ्यासक, संशोधक, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

माध्यमांनी स्वयंनियमन करावे शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

माध्यमांनी स्वयंनियमन करावे शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर   कोल्हापूर(प्र…