no images were found
सबजेल रोडवरच्या भीषण अपघातात महिलेसह तिघेजण गंभीर जखमी
कोल्हापूर : भवानी मंडप ते बिंदू चौक सबजेल रोडवर चालकाचा ताबा सुटलेल्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेसह तिघेजण गंभीर जखमी झाले.थेट रस्त्यावर पार्क केलेल्या 7 दुचाकींनाही ठोकरल्याने त्यांचे तसेच दुकानांसह स्टॉलचेही नुकसान झाले आहे. मध्यवर्ती व गजबजलेल्या रस्त्यावर सायंकाळी दुर्घटना घडल्याने घटनास्थळी गर्दी झाली
राजेश श्रीपती तोरस्कर (वय 48), राणी राजेश तोरस्कर (42, रा. रविवार पेठ) यांच्यासह एक मुलगाही जखमी झाला आहे. तोरस्कर दाम्पत्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मुलाचे नाव समजू शकले नाही. राजेश तोरस्कर यांची प्रकृती गंभीर आहे. कारचालक सतीश नायडू (75, रा. पुणे) याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मध्यवर्ती व गजबजलेल्या रस्त्यावर सायंकाळी दुर्घटना घडल्याने घटनास्थळी गर्दी झाली. रस्त्यावर पार्क केलेल्या 7 दुचाकींनाही ठोकरल्याने त्यांचे तसेच दुकानांसह स्टॉलचेही नुकसान झाले आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहने इतरत्र पडल्याने बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात तोरस्कर कुटुंबीय, नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. सहायक निरीक्षक संदीप जाधव यांच्यासह जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व शहर वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पुणे येथील काही भाविक आदमापूर येथील बाळूमामाच्या दर्शनानंतर ते अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान कार सबजेल रोडवरून बिंदू चौकाकडे जात होती.सबजेलपासून काही अंतरावर चालकाचा ताबा सुटला. भरधाव कारने तोरस्कर दाम्पत्याला जोरात धडक दिली. यामध्ये राणी तोरस्कर रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या, तर पती राजेश मोटारीखाली सापडले. यावेळी एक लहान मुलगाही जखमी झाला. कार एवढी भरधाव होती की, रस्त्याच्या बाजूला असलेल्या कापड, चप्पल विक्री दुकान, स्टॉलधारकांसह सात दुचाकी वाहनांना उडविले.