
no images were found
सांगली – सातारा जिल्ह्याची शिवसेना संपर्कप्रमुख पदाची धुरा श्री.राजेश क्षीरसागर यांच्यावर
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात शिवसेनेची भक्कम बांधणी होत आहे. मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी लोकहिताच्या निर्णयाचा धडाका लावला असून, त्याचे जनतेतून स्वागत होत आहे. पुढील काळात शिवसेना पक्षवाढीसाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत असून, पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, सहकार, कला, क्रीडा आणि शिक्षण या क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका असलेल्या सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कप्रमुख पदाची धुरा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
दि. ६ मे १९८६ साली कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहुतमेढ रोवली. शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थापनेपासूनचा शिवसैनिक म्हणून श्री.राजेश क्षीरसागर यांची ख्याती आहे. शिवसेना अंगीकृत भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख, त्यानंतर भारतीय विद्यार्थी सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख, शिवसेना कोल्हापूर शहरप्रमुख अशा पदांवर काम करून विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम श्री.क्षीरसागर यांनी केले. याच कामाची पोहच पावती म्हणून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. या निवडणुकीत कोल्हापूर वासियांनी सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या कार्यकर्त्या शिवसैनिकाला आमदार बनविले. यानंतरही विधिमंडळात टोल, एल.बी.टी., रस्ते प्रकल्प, थेट पाईपलाईन, असे सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुन्हा कोल्हापूरवासियांनी कोल्हापूर उत्तरचा आमदार म्हणून निवडून दिले. यानंतर २०१९ मध्ये त्यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. नुकतीच महाराष्ट्र राज्य शासनाच्या मित्र संस्थेच्या उपाध्यक्ष पदाची अधिकची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीमध्येही श्री.क्षीरसागर यांचा समावेश करण्यात आला आहे.
श्री.राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची झालेली संघटनात्मक बांधणीतून शिवसेनेने मोठी मजल मारली आहे. त्याच पद्धतीने सांगली आणि सातारा जिल्ह्यात शिवसेना तळागाळापर्यंत पोहचवून शिवसैनिकांची मोट बांधण्याचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी श्री.राजेश क्षीरसागर यांच्यावर संपर्कप्रमुख पदाच्या निवडीतून मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी सोपविली आहे.