no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या
विद्यार्थ्यांनी अनुभवले वायुदलाचे अंतरंग
-भारतीय वायूदलाकडून करिअर जनजागृती
-ट्रेनीग अँड प्लेसमेंट विभागकडून आयोजन
कसबा बावडा/ वार्ताहर
भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) कार्य, वायूसैनिकांचा गणवेश, विविध लढाऊ विमाने… इतकेच नाही तर प्रत्यक्ष विमान चालवण्याचा आभासी अनुभव घेण्याची अपूर्व संधी बुधवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळाली. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजित केलेल्या ‘भारतीय वायुसेनेमधील विविध करिअर संधींबद्दल जागरूकता कार्यक्रमा’ मुळे हजारो विद्यार्थ्यांनी भारतीय वायुसेनेचे अंतरंग अनुभवले.
भारतीय वायुसेनेची (आयएएफ) विद्यार्थ्याना माहिती व्हावी आणि करिअर म्हणून त्यानी या सेवेकडे वळावे या हेतूने आयएएफने तयार केलेल्या ‘इंडक्शन पब्लिसिटी एक्झीबीशन व्हेईकल’ या व्होल्वो व्हॅन (IPEV) च्या माध्यमातून देशभर जनजागृती कार्यक्रम राबवला जात आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्यावतीने बुधवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वायुसेनेच्या अधिकाऱ्यानी विद्यार्थ्यांना वायूसेनेतील संधी व करिअरबाबत सविस्तर माहिती दिली.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात दाखल झालेल्या या व्होल्वो व्हॅनमध्ये वायूदलाशी संबधित मॉडेल्सची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये ए.आर. आणि व्ही.आर. तंत्रज्ञांच्या माध्यमातून भारतीय वायू दलाचे अंतरंग उलगडण्यात आले आहेत. प्रत्यक्ष युद्ध व अन्य आपत्कालीन स्थितीत वापरली जाणारी विविध लढाऊ विमाने, युवक केंद्रित विविध गॅझेट, गणवेश, वापरले जाणारे तंत्रज्ञान यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे सिम्युलेटरच्या माध्यमातून प्रत्यक्ष विमान चालवण्याचा अभूतपूर्व अनुभव विद्यार्थ्यांना यावेळी घेता आला.
फ्लाइंग लेफ्टनंट दया एस. अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली वायुदलाच्या पथकाने विद्यार्थ्यांना यावेळी माहिती देऊन भारतीय वायू सेनेत सामील होण्याचे आवाहन केले. सुमारे २ हजार विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना विविध करीअर संधीची माहिती व्हावी यासाठी महाविद्यालयातर्फे विविध उपक्रम नेहमीच राबवले जातात. भारतीय वायूसेनेच्यावतीने राबवण्यात आलेल्या हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी थरारक तितकाच प्रेरणादायी होता. वायूसेनेच्या माध्यमातून करिअर व देशसेवा अशा दोन्ही संधी मिळणार असल्याने निश्चितच त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल असा विश्वास डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन सुतार, हेड ट्रेनिंग मकरंद काईंगडे, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होत.