no images were found
सर्वसामान्यांनाही सर्वोच्च आरोग्य सेवा मिळणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, : अल्पावधीतच राज्यात विविध १० वैद्यकीय महाविद्यालयांसह १२०० एमबीबीएस विद्यार्थ्यांची सुविधा निर्माण करणारे महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर असून, यातून सर्वसामान्य गोरगरीबांना सर्वोच्च व अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या हस्ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू वैद्यकीय नगरीतील आयसोलेशन हॉस्पिटल समोरून वैद्यकीय नगरीकडे जाणाऱ्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या २५ कोटी रुपयांच्या स्वनिधीतून तयार झालेल्या १०० फुटी काँक्रीट रस्त्याचे तसेच अत्याधुनिक ५०० आसनक्षमता असलेल्या ऑडिटोरीयमच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, डॉ. अजित लोकरे, अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, कार्यकारी अभियंता (विद्युत) श्रीमती कट्टी यांच्यासह महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर येथे आता अत्याधुनिक वैद्यकीय नगरी उभी राहत आहे. ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय, २५० खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय व २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येत असल्यामुळे भविष्यात पुणे व मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही. येत्या दोन महिन्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ११०० खाटांच्या रुग्णालयासह छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विविध नुतनीकरणाच्या कामांचे लोकार्पण होणार आहे. अशा प्रकारे आरोग्य सुविधा निर्माण झाल्यानंतर कोणालाही शासकीय रुग्णालयातूनच आरोग्य सेवा घेण्याची इच्छा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. लोकार्पण झालेल्या दोन हजार चौरस फुट क्षेत्रातील अत्याधुनिक वातानुकूलित ऑडिटोरीयममध्ये ४८५ आसनक्षमता असून, यामुळे कोल्हापूरकरांना एक उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच छत्रपती शाहू वैद्यकीय नगरीतील आयसोलेशन हॉस्पिटल समोरून वैद्यकीय नगरीकडे जाणाऱ्या १०० फुटी काँक्रीट रस्त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा फायदा होणार आहे. येत्या काळात हा रस्ता पुढे शेंडा पार्क, आर. के. नगरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. वैद्यकीय नगरीसह सीपीआरमध्ये निर्माण झालेल्या सुविधा येणाऱ्या काळात सुव्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी आता महाविद्यालयाकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार अमल महाडिक यांनी यावेळी आरोग्याचा केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या क्षेत्रात सर्वोच्च योगदान देण्याचे आवाहन उपस्थित आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले. ते पुढे म्हणाले की, शेंडा पार्क ते आर. के. नगरपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा डीपीआर सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करावा. शेंडा पार्क परिसरात सुमारे पन्नास हजार लोकवस्ती निर्माण झाल्याने भविष्यात अनेक सुविधा येथे उभारल्या जातील. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरमध्ये निर्माण झालेल्या या सुविधा देश-विदेशात ओळख निर्माण करतील, अशा स्वरूपात सेवा देण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी आरोग्य सेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नसून, ती प्रशिक्षण व संशोधनासाठीही महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी निर्माण झालेल्या सुविधांची माहिती दिली.
प्रास्ताविक डॉ. अजित लोकरे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले तर आभार डॉ. मिरजे यांनी मानले. कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये योगदान दिलेल्या पुरवठादार व अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला.
लोकार्पण केलेल्या सुविधा –
काँक्रीट रस्ता : लांबी – १ किलोमीटर, रुंदी – १०० फूट. ओढ्यावरील दोन पुलांच्या बांधकामासह ७०० मीटर लांबीची रिटेनिंग वॉल, विद्युतीकरण व वृक्षारोपण, रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडरसह दोन्ही बाजूंना एक मीटर रुंदीचे पेविंग ब्लॉक्स, बाजूपट्ट्या व गटारी आदी कामांचा समावेश.
अत्याधुनिक ऑडिटोरियम : कोल्हापुरात प्रथमच शेंडा पार्क येथे साकारलेले अत्याधुनिक ऑडिटोरियम. आसनक्षमता – ५००. अत्याधुनिक साऊंड सिस्टिमसह डॉक्टरांच्या परिषद व कार्यशाळांसाठी उपयुक्त सुविधा.