
no images were found
सांगली कोल्हापूर रस्त्यावरील भरवस्तीत फोडले घर
सांगली : सांगली कोल्हापूर रस्त्यावरील चौगुले प्लॉटमधील अशोक बालकिशोर जुमराणी (वय 48) यांचे भरवस्तीतील घराचा मुख्य प्रवेशद्वाराची कडी व कोयंडा तोडला. बेडरुमधील कपाट उघडले व सोन्याचे दागिने व 28 हजाराची रोकड असा एकूण सव्वालाखाचा ऐवज लंपास केला.
जुमराणी यांचे लाईट दुकान आहे. चौगुले प्लॉटमधील गुप्ते नर्सिंग होमजवळ त्यांचे घर आहे. पहाटे पाच वाजता जुमराणी कुटुंब परगावी गेले होते. याचदिवशी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा तोडला. बेडरुमधील कपाट उघडले. त्यामधील साहित्य विस्कटले. लॉकरमधील विविध प्रकारचे सोन्याचे दागिने व रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केले.
सोमवारी मध्यरात्री जुमराणी कुटुंब परगावाहून परतले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरा जुमरानी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे. या परिसरातील तसेच कोल्हापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज ताब्यात घेऊन तपासणी केली जात आहे.