no images were found
अधिवेशनात कांद्यावरून सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले
मुंबईः विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या दिवशी सरकारला विरोधकांनी कांद्यावरून चांगलेच घेरले. कांद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री बोलत असतानाही विरोधकांनी एकच गोंधळ सुरु केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाना शांत राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी पडलेल्या कांद्याच्या भावावरुन सरकारला धारेवर धरलं. सरकार शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करीत नसल्याचा आरोप भूजबळांनी केला. या गोंधळातच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात आश्वासन दिलं
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अलीकडेच ५०० किलो कांदा विकून एका शेतकऱ्याला सगळा खर्च वसून करुन व्यापाऱ्याने अवघे दोन रुपये हातावर ठेवले होते. असेच काही प्रकार राज्याच्या इतर भागांमध्ये घडले होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला होता. या असंतोषाचे पडसाद मंगळवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या आमदारांनी कांदा आणि लसणाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून सरकार विरोधात घोषणा देत होते. ‘कांदा कापूसचे हाल काय, शिंदे फडणवीस हाय हाय’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘कांदा खरेदी केंद्रे सुरु झालीच पाहिजेत’, अशा घोषणांनी विरोधकांनी विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही सध्या प्रचारातच मग्न आहेत. या दोघांना सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. शिंदे-फडणवीस सरकार सध्या केवळ ४० आमदारांना खुश ठेवण्यात मग्न आहे. जनतेच्या समस्यांकडे त्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
सभागृहात भूजबळांच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र बोलत असतांना विरोधकांनी एकच गोंधळ सुरु केला. मुख्यमंत्र्यांना विरोधी आमदार बोलू देत नव्हते. तिकडून अध्यक्ष सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करीत होते. मात्र कुणी शांत बसत नव्हतं. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठले आणि त्यांना सर्वांना ऐकून घेण्याचं आवाहन केलं.
मात्र विरोधक काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. मग फडणवीसांचाही रागराग झाला. तुम्हाला सरकारच्या कांदा धोरणासंदर्भात माहिती असेल तुम्हीच बोला, आम्ही बसतो. असं म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात आश्वासन दिलं आहे.
‘कांदा निर्यातीवर कसलीही बंदी नाही. नाफेडने कांदा खरेदी केली आहे. हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर सरकार त्यासंदर्भात मदतीचा निर्णय घेईल’ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विरोधकांच्या गदारोळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावल्याने चर्चा पुढे सुरु झाली.