no images were found
गोखले पुलाचे पाडकाम रेल्वेकडूनच; मंत्रालयातील बैठकीत निर्णय
पुलाचे पाडकाम रेल्वेच करेल- पालकमंत्री लोढा; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा.
मुंबई : अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाच्या रेल्वेमार्गावरील भागाचे पाडकाम कोण करणार, यावरून मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात मतभेद होते. त्यावरून सुरू असलेला वाद संपुष्टात आला असून या पुलाचे पाडकाम रेल्वे करेल, अशी माहिती मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिली. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान अंधेरीतील गोखले पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता तरीही या पुलाच्या काम पाडकाम रखडले आहे. रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा भाग रेल्वेनेच तोडावा, असा पालिकेचा आग्रह आहे तर, रेल्वेला या प्रक्रियेसाठी सात-आठ महिने लागतील, असे रेल्वेचे म्हणणे आहे. याबाबत शुक्रवारी दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमत होऊ शकले नव्हते.
मंत्रालयात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या बाबतीतील बैठकीचे आयोजन करण्यात आले. या पुलाचे पाडकाम रेल्वे करेल, अशी माहिती मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिली. ‘पुलाचे पाडकाम ३ ते ४ महिन्यांत रेल्वेकडून करण्यात येईल. मुंबई महापालिका पुलाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू करेल. मे २०२३ अखेपर्यंत पुलाची किमान एक मार्गिका सुरू करण्याचा मानस आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या पुलासंदर्भात रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला आमदार अमित साटम, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू आदी उपस्थित होते.