no images were found
५५ आमदारांना बजावला पक्षादेश
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या, अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर हे पहिले अधिवेशन आहे.या पक्षाने सर्व ५५ आमदारांना रविवारी व्हिप म्हणजे पक्षादेश बजावला आहे. दोन आठवडे कोणीही व्हिप न बजावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही हा व्हिप बजावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या ४० आमदारांची रविवारी बैठक झाली असून या बैठकीत अर्थसंकल्पातील काय रणनीती आखावी यावर चर्चा झाली.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व ४० आमदारांना अधिवेशना संदर्भात सूचना केल्या. तसेच शिवसेनेच्या आमदारांना व्हिप बजावण्याचा निर्णय या बैठकीत झाला. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी हा व्हिप आहे. या व्हिपचा कोणी भंग केला तरी त्या आमदाराच्या विरोधात कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण गोगावले यांनी दिले.शिंदे गटाकडे ४० आणि ठाकरे गटाकडे १५ असे शिवसेनेचे विधानसभेत ५५ आमदार आहेत. व्हिप कोणी कोणावर बजावावा, हा शिवसेनेच्या दोन्ही गटांत वादाचा मुद्दा बनला आहे. याबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पुढील दोन आठवडे कोणीही म्हणजे शिंदे आणि ठाकरे गटाने व्हिप बजावता कामा नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या १५ आमदारांना व्हिप बजावल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेच्या ५५ आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे.