
no images were found
आ. मुश्रीफ यांना घेरण्यासाठी किरीट सोमय्या पुन्हा कोल्हापुरात : वातावरण तंग
कोल्हापूर – राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना घेरण्यासाठी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी येथील विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि जिल्हा मध्यवर्ती सह. बंकेत जाऊन तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. तर जिल्हा बँकेशी संबधित शेतकऱ्यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेऊन बँकेची बदनामी थांबवावी अशा आशयाचे निवेदन दिले. निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याने विभागीय सहनिबंधक कार्यालयाजवळ काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.
राजकीय द्वेषातून जिल्हा मध्यवर्ती बँकेची चालवलेली बदनामी थांबवण्याच्या मागणी करता विविध पक्ष आणि संघटनाचे शेतकरी आज किरीट सोमय्या यांना विभागीय सहनिबंधक कार्यालयाजवळ भेटण्यासाठी आले होते. मात्र पोलिसांनी दोनच शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी दिल्याने या ठिकाणी किरकोळ वादावादीचा प्रकार घडला. त्यामुळे विभागीय सहनिबंधक कार्यालया जवळचे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.
किरीट सोमय्या यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर नियम बाह्य कर्ज दिल्याचा आरोप केला. यामुळे जिल्हा बँकेवर इडीने छापा टाकून बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची इडीच्या मुंबई येथील कार्यालयात नेऊन चौकशी केली. या पार्श्वभूमीवर आज सोमय्या यांनी प्रभारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांची भेट घेतली. मात्र सोमय्या करत असलेल्या आरोपामुळे जिल्हा बँकेची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. परिणामी सोमय्यांनी बँकेची बदनामी थांबवण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे आणि शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते, शेतकरी आले होते.
सोमय्या यांची भेट घेण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांनी केला. मात्र पोलिसांनी केवळ दोनच शेतकऱ्यांना सोमय्या यांना भेटण्याची परवानगी दिल्याने, या ठिकाणी काही काळ गोंधळ उडाला होता. अखेर पाच शेतकऱ्यांना सोमय्या यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी सोमय्या यांनी प्रभारी विभागीय सहनिबंधक काकडे यांच्या दालनात या शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं. कोल्हापूर जिल्हा सधन आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत. त्यामुळे सोमय्यानी शेतकऱ्याची अर्थवाहिनी असलेल्या बँकेची नाहक बदनामी करू नये. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या का करतो. त्याची चौकशी सोमय्यानी करावी अशी परखड मागणी शेतकरी कामगार पक्षाचे बाबासो देवकर यांनी सोमय्यांकडे केली. यावेळी किरकोळ शाब्दिक वादावादीचा प्रकार देखील घडला.
यावेळी संभाजी पवार, सुनील परीट,आनंदा बोते, कृष्णात मेटील यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.