
no images were found
मुश्रीफांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीनाला ईडीकडून विरोध
मुंबई : आ.हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाकडून (इडी) ३५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ईडीकडून अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
ईडीने आ. मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला कडाडून विरोध करताना म्हटले आहे की, हसन मुश्रीफ यांची मुलं सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. प्राथमिक चौकशीत कारखान्याला मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे आणि या पैशाच्या स्त्रोताविषयी कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही. हा पैसा अवैध मार्गाने आल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेलं नाही. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर झालेले नाहीत. जामीन दिल्याने चौकशीवर परिणाम होईल,
हसन मुश्रीफ यांच्या नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ या मुलांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. अर्जात राजकीय हेतूनं अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांकडून वरिष्ठ वकील आबाद पोंडा आणि प्रशांत पाटील यांनी सत्र न्यायालयात बाजू मांडली. ईडीकडून हसन मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा मुख्य हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याविरोधात कोणतेही गैरव्यवहार केल्याचे समोर आलं नसल्याचे सांगितले. ईडीने हे आरोप फेटाळून लावताना न्यायालयात दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले. छापेमारी कायदेशीर मार्गाने झाल्याने ईडीने सांगितले.
आ. हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी ११ जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली होती. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला.११ जानेवारी रोजीच ईडीकडून पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपामागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली होती.
या छापेमारीनंतर २१ दिवसांनी १ फेब्रुवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील ‘गोडसाखर’ला (अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना) लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी केली होती. यावेळी तब्बल३० तास छापेमारी केल्यानंतर बँकेच्या पाच अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेत मुंबईला नेऊन चौकशी केली होती. ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची ७० तासांनी ईडीने सुटका केली होती.ईडीकडून अटकपूर्व जामीनाला विरोध झाल्यामुळे आ.मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आ.मुश्रीफ यांची चिंताही वाढली आहे.