no images were found
पंढरीच्या विठुराया चरणी कोटींचं दान
पंढरपूर :या वर्षीच्या माघ यात्रेच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न चौपट वाढले असून देवाच्या चरणी तब्बल ४ कोटी ८८ लाख ६२ हजार २८ रूपयांचे भरभरून दान मिळाले आहे. याबाबतची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
यंदाची माघ शुद्ध जया एकादशी १ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. यंदाच्या वर्षी माघीसाठी विक्रमी संख्येने वारकरी आले होते. सुमारे ५ लाख भाविकांनी श्रींचे पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीकडे झाली आहे. भाविक संख्या वाढल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नात ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यात्रा कालावधी २२ जानेवारी ते ५ फेब्रुवारी असा असून याकाळात मंदिर समितीला प्राप्त झालेल्या उत्पन्नाची माहिती यंदा माघी यात्रा काळात मंदिर समितीचे उत्पन्न मागील वर्षी झालेल्या माघी यात्रेच्या तुलनेत जवळपास चौपट झाले आहे. यात्रा काळात सुमारे ८ लाखांहून अधिक वारकरी पंढरीत येऊन गेले आहेत. त्यामुळे मंदिर समितीचे उत्पन्न हि भरघोस वाढले आहे.
विशेष म्हणजे यंदा सोन्याच्या स्वरुपात तब्बल १ कोटी ५९ लाख ९० हजार रुपयांचे दागिने आले आहेत. ६ लाख ७१ हजार रूपयांचे चांदीचे दागिने जमा झाले आहेत. आजवर मंदिर समितीला सोन्या – चांदीचे एवढे किंमतीचे दागिने देणगी स्वरुपात मिळाले नव्हते. त्याच बरोबर भाविक मोठ्या संख्येने आल्याने मंदिर समितीच्या वेदांता, व्हिडिओकॉन, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथून एकूण १९ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर ३२ लाख रुपये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पायावर देणगी जमा झालेली आहे. मंदिर समितीच्या हुंडी पेटीतून गत वर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे ७८ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ऑनलाईन स्वरुपात १२ लाख ४१ हजार रुपये देणगी जमा झाली आहे.