no images were found
जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार : जिल्हाधिकारी रेखावार
कोल्हापूर : कोरोना महामारीसारख्या आजारांना व आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रोग निदान आरोग्य शिबिर, महा रक्तदान शिबिर, जागरुक पालक सुदृढ बालक अभियान व हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ स्थापन करणे आदी कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, राज्याच्या आरोग्य विभागाची कामगिरी देशात उत्कृष्ट आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या व भावी पिढीच्या उत्तम आरोग्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजनेतून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापुढेही प्रशासनाच्या वतीने अधिक चांगल्या सेवा -सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून आजवर आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यात आल्याबद्दल जिल्हाधिकारी रेखावार यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच यापुढेही सर्वसामान्यांना चांगली सेवा द्यावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी रेखावार यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, शून्य ते नऊ वर्ष वयोगटात मुलांच्या बुद्धीची साधारण ८५ टक्के वाढ होते. पूर्वीच्या काळी मोठ्या कुटुंब व्यवस्थेमुळे आजी, आजोबांसह कुटुंबातील अन्य सदस्य वेगवेगळ्या बाबींबाबत बालकांसोबत गप्पा मारत असत. यामुळे संवादातून मुलांच्या बुद्धीचा विकास होत होता. परंतु सध्या छोट्या कुटुंब व्यवस्थेत पालक व बालकांमधील संवाद हरवत चालला असून मोबाईलचा वापर वाढत आहे. मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक प्रगतीसाठी पालकांनी आपल्या बालकांना वेळ देवून त्यांच्याशी मोकळा संवाद साधायला हवा, असे आवाहन करुन जिल्ह्यातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षला वेदक, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ.सुप्रिया देशमुख, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय रणवीर, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट दिली तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.