no images were found
महावितरणकडून कोल्हापूर, सांगलीतील बाराशे ट्रान्सफार्मरची दुरुस्ती
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यात शेतीपंपाच्या सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरणकडून नादुरुस्त झालेली १२०२ रोहित्रे दुरुस्त करून बसविण्यात आली आहेत. सद्यस्थितीत महावितरणकडे पुरेश्या प्रमाणात ट्रान्सफार्मर व ऑईलचा साठा उपलब्ध आहे. महावितरणकडून नादुरुस्त ट्रान्सफार्मर तातडीने बदलण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ३७२ व सांगली जिल्ह्यातील ८३० रोहित्रे बदलण्यात आली आहेत. वाढीव वीज भार वा इतर तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्सफार्मर नादुरुस्त होतात. ट्रान्सफार्मरवरील अनाधिकृत वीज भार हटविण्यासाठी वीजचोरीविरुद्ध तीव्र मोहिम राबविण्यात येत आहे. अनधिकृत वीज भार आटोक्यात आणण्यासाठी कठोर कारवाई केली जात आहे. सर्व शेतीपंप ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी नादुरुस्त ट्रान्सफार्मर तातडीने बदलून दिली जात आहेत. तरी आपल्या भागातील रोहित्रे नादुरुस्त झाल्यास तत्काळ महावितरणच्या नजीकच्या शाखा वा उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महावितरणने आवाहन केले आहे. तसेच वीज देयके चुकीची असल्यास त्याची दुरुस्ती ही त्वरीत करण्यात येत आहे.