no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचा उपक्रम
कोल्हापूर : प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या वतीने शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी एच. आर. मॅनेजर यांच्यासाठी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (एमडीपी) आयोजित करण्यात आलेला आहे. येथील सयाजी हॉटेलमध्ये दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे ख्यातनाम वकील जमशेद कामा यांच्या हस्ते होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील हे यावेळी प्रमुख उपस्थित असतील.
‘चेंजिंग लँडस्केप ऑफ लेबर लॉ फ्रेमवर्क अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इंडस्ट्रीज’ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा कार्यक्रम होत आहे. यासाठी पुण्याचे कामगार कायदेतज्ञ ॲड. श्रीनिवास इनामती, मुंबई उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील वरुण जोशी, कामगार आयुक्त , कोल्हापूरचे नामांकित वकील दीपक जोशी, ॲड. राजेंद्र चव्हाण, इंडस्ट्रियल हेल्थ अँड सेफ्टीचे जॉईंट डायरेक्टर सुरेश जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सुधारित कामगार कायद्याच्या अनुषंगाने तज्ञांकडून सखोल चर्चा आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना कामगार कायद्याच्या अनुषंगाने अनेक अडचणी येत आहेत. या अडचणींचे निराकरण कसे करायचे, याची चर्चाही यावेळी होणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध कंपन्या आणि संस्थांच्या एच. आर. मॅनेजर यांनी सहभागी होणे अपेक्षित आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट चे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी यांनी केले आहे.