no images were found
सुमंगलम् लोकोत्सव यशस्वी होण्यासाठी शासन गतिमान: चंद्रकांत दादा पाटील
कोल्हापूर : सिद्धगिरी मठ कणेरी येथे 20 ते 26 फेब्रुवारी पर्यंत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सुमंगलम् लोकोत्सवाचे कोल्हापूर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन टाकाळा येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी झाले.
या उद्घाटनानंतर चंद्रकांत पाटील व काड सिद्धेश्वर स्वामीजींनी या लोकोत्सवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मंत्री पाटील म्हणाले, पर्यावरणाचा रास ही जागतिक समस्या झाली आहे. कणेरी मठाने आयोजित केलेला सुमंगलम् महाभौतिक लोकोत्सवाव्दारे मोठ्या प्रमाणात लोकप्रबोधन होईल म्हणूनच महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम आपला मानला आहे. कोल्हापूरात न भूतो असा हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सुनियोजित व्हावा, जास्तीत जास्त लोकांना व्यवस्थित पाहता यावा, कोणतीही उणीव राहू नये, कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी आता राज्य शासनाचा प्रत्येक विभाग गतीशील झाला आहे . या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. दहा राज्याचे मुख्यमंत्री, अनेक राज्यपाल, 500 हून अधिक कुलगुरू, सुमारे एक हजाराहून अधिक साधू-महंत, यांच्यासह शास्त्रज्ञ, समाजसेवक, उद्योगपती सुमारे चाळीस लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उत्सवासाठी उपस्थित राहावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या कार्यक्रमाच्या तयारीसाठी अनेक राज्यातून कार्यकर्ते येत असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तरुण व विविध समाज संस्थांनी पुढाकार वाढवला पाहिजे.
यावेळी बोलताना काडसिध्देश्वर स्वामीजी म्हणाले, या उत्सवाची तयारी वेगाने सुरू असून शासकीय स्तरावरून या उत्सवाच्या तयारीत अमूल्य सहकार्य मिळत आहे. समाज जागृतीसाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पर्यावरणीय समतोल बिघडत चालला असून त्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपण वेळीच सावध होऊन पर्यावरण संवर्धनासाठी पावले टाकले नाहीत तर येणाऱ्या काळात आपल्याला भीषण समस्यांना तोंड द्यावी लागू शकते. म्हणूनच सर्व सृजन शक्तीने एका व्यासपीठावर एकत्र येऊन याबाबत दिशा ठरविण्यासाठी हा पंचभौतिक सुमंगलम उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवात प्रत्येक महाभूतांच्या संबंधित सखोल माहिती देणाऱ्या विस्तृत प्रदर्शनी असतील त्याच सोबत या उत्सवातील प्रत्येक दिवस एका महाभूतावर आधारित असेल. त्याशिवाय भारतातील पारंपारिक वैद्यांचे एक विशेष दालन या उत्सवात असेल. उत्सवात हजारो स्टॉल असतील. त्यात समाजातील विविध बचत गट, दुर्गम भागातील संस्था, त्यांची उत्पादने विक्री करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या उत्सवात पन्नास हजार अतिथी व संयोजकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्यांना दोन्ही वेळचे भोजन व्यवस्थेचे नियोजन ही अत्यंत चोख करण्यात आले आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे
अवचित्य साधून कोल्हापूर शहरात भव्य शोभा यात्रेचे ही आयोजन करण्यात आले आहे . कोल्हापुरातील लोकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पत्रकार परिषदेला डॉक्टर संदीप पाटील, शंकर पाटील, माणिक पाटील चुयेकर , प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील , बापू कोंडेकर, कुमार पाटील उपस्थित होते.